चिंता नको, फलंदाजी नक्कीच बहरेल; पहिल्या पराभवानंतरही सर जाडेजा आशावादी

119

सामना ऑनलाईन । लंडन

 ‘हा आमचा पहिला सराव सामना होता. पहिल्या सामन्यातल्या कामगिरीवरून तुम्ही खेळाडूंच्या अथवा संघाच्या कामगिरीचं परीक्षण नाही करू शकत. त्यामुळे माझ्या मते फलंदाजीविषयी चिंता करण्याचं काही कारण नाहीय. हिंदुस्थानातून इंग्लंडमध्ये आल्यावर पाटा खेळपट्टय़ांवर खेळताना सुरुवातीला कठीण जातेच. त्यातून सावरत स्वतःचा खेळ सुधारण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. टीम इंडियातला प्रत्येक फलंदाज हा अनुभवी आहे. मुख्य स्पर्धेत हिंदुस्थानी फलंदाजी नक्कीच बहरेल’ अशी आशावादी भूमिका टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जाडेजा याने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.

शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात हिंदुस्थानी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने सहा गडी राखून टीम इंडियाने दिलेलं आव्हान पूर्ण करत आपल्या विश्वचषकाची सुरुवात चांगली केली. या तुलनेत हिंदुस्थानी फलंदाजी पहिल्या सामन्यात पुरती कोलमडली. रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांडय़ाचा अपवाद वगळता टीम इंडियाचे फलंदाज फारशी प्रभावी खेळी करू शकले नाहीत. मात्र या पराभवानंतरही रवींद्र जाडेजा आशावादी आहे. हिंदुस्थानला फलंदाजीची चिंता करण्याची गरज नसल्याचं जाडेजाने म्हटलं आहे. जाडेजाने पहिल्या सराव सामन्यात अर्धशतकी खेळी करत हिंदुस्थानला 179 धावांचा टप्पा गाठून दिला होता.

हिंदुस्थानी सुपरस्टार फ्लॉप झाल्याने पराभव

सराव सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रवींद्र जाडेजाचा (54) अपवाद वगळता हिंदुस्थानच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. जाडेजाच्या अर्धशतकी खेळीमुळे हिंदुस्थानला 179 धावांचा टप्पा गाठता आला. अर्धशतकी खेळीत जाडेजाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. कर्णधार विराट कोहलीसह सलमीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल स्वस्तात बाद झाले. हार्दिक पांडय़ाने (30) थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. एम. एस. धोनी (17) आणि दिनेश कार्तिक (4) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पांडय़ा आणि कार्तिकला निशामने तर धोनीला साऊदीने बाद केले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने भेदक मारा करत रोहित (2), शिखर (2) आणि राहुलला (6) स्वस्तात बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या