कूलभूषण जाधव यांच्या फाशीचा निर्णय मेरीटवरच – पाकिस्तान

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचा दयेचा अर्ज पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे जाधव यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बजवा यांच्याकडे दयेची याचिका दाखल केली आहे. दरम्यान जाधव यांच्या फाशीवरील निर्णय मेरीटवरच घेणार असल्याचे पाकिस्तानने म्हटलं आहे.

हेरगिरी व दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने जाधव यांना अटक केली आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली आहे. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने जाधव यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार केले व न्यायालयात सादर केले होते. पण न्यायालयाने त्याची दखल न घेतल्याने पाकड्यांचा तिळपापड झाला आहे. जाधव यांना हिंदुस्थानी दूतावासाशी संपर्क करु द्यावा यासाठी हिंदुस्थानने १७ वेळा पाकिस्तानकडे अर्ज केला. पण पाकिस्तानने त्याची दखलही घेतलेली नाही.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव प्रकरणाची दखल घेतल्यानंतर मात्र पाकड्यांनी जाधव पाकिस्तानचे लष्करी न्यायालय व लष्करप्रमुखांकडे दया याचिका दाखल करु शकतात असे म्हटले होते. त्यानुसार जाधव यांनी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात अर्ज केला. पण न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर जाधव यांनी लष्कर प्रमुख कमर जावेद बजवा यांच्याकडे दयेची याचिका दाखल केली आहे. बजवा त्यावर विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. पण त्याचबरोबर जाधव यांच्या फाशीचा निर्णय मेरीटवरच घेणार असल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने म्हटले आहे.