जगबुडीच्या पुनरूज्जीवनाला सुरूवात होणार,जलपुरूष राजेंद्र सिंहदेखील सहभागी होणार

 

सामना ऑनलाईन। मुंबई

लाईक करा, ट्विट करा

कोकणातील प्रसिद्ध अशा जगबुडी नदीच्या पुनर्जीवनाच्या प्रत्यक्ष कामाला 1 जानेवारीला सुरूवात होणार आहे. धामणंदजवळच्या ‘साखर’ या गावातून या पुनरूज्जीवनीकरणाला सुरूवात होईल. साखर, म्हांळुंगे, वडगांव, आंबवली व वरवली या पाच गावांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

जगबुडी पुनर्जीवन या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 18 जानेवारी 2016 रोजी झाले होते.जलपुरूष म्हणून नावाजलेले राजेंद्रसिंग हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित होते. कोकणला समृद्ध करण्याच्या दृष्टीने पाण्यचे नैसर्गिक स्त्रोत पुनर्जीवन करणे ही काळाची गरज असल्याचे राजेंद्रसिंग यांनी त्यावेळी सांगितले होते. ग्रामस्थांचे श्रमदान आणि शासकीय निधी याची व्यवस्थित सांगड घालून हा उपक्रम राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जगबुडी या मुख्यनदीवर असलेल्या उपनद्यांचे पाणी बंधारे घालून अडविले जाणार आहे. त्यानंतर उपनद्यांचे गाळाने भरलेले लहान लहान डोह मोकळे केले जाणार आहेत. लोकसहभागातून ही कामे पूर्ण झाली की जगबुडी नदीवर आवश्यक तिथे सिमेंटचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. या कामांसाठी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि जलसंधारण खात्याचे मार्गदर्शन आणि मदत घेतली जाणार आहे.

उपनद्या आणि मुख्यनदीतील डोहांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नदी परिसरात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. कोकणतील पाण्याची समृद्धता निसर्गावरील मानवाच्या अक्रमणामुळे कमी व्हायला लागली आहे. जर कोकणाचं वाळवंट करायचं नसेल तर कोकणातील नद्यांचंही पुनरूज्जीवीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे.