जय जपान! जय इंडिया!! मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमिपूजन

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन आज जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘जय जपान, जय इंडिया’चा नारा देण्यात आला. अहमदाबाद येथील रेल्वे स्टेडियमवर हा भूमिपूजनाचा सोहळा झाला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, बिनव्याजी कर्ज देणारा मित्र किंवा बँक सापडेल का? पण जपानसारखा आणि शिंजो आबेसारखा मित्र मिळाला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपानने 88 हजार कोटी रुपयांचे कर्ज 0.01 टक्के दराने दिले आहे. 50 वर्षांत कर्जाची परतफेड करायची असून, एकप्रकारे बुलेट ट्रेन फुकटातच मिळत आहे. बुलेट ट्रेनमुळे देशाच्या विकासाला वेगात गती मिळेल आणि प्रगती होईल. रोजगार वाढेल. इंधनाचा वापर कमी होईल, पर्यावरण रक्षण आणि वेळेची बचत होईल. मुंबई आणि अहमदाबाद शहरांमधील परिसर ‘सिंगल इकॉनॉमिक झोन’ म्हणून विकसित होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे मोदी यांनी सांगितले. 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असे ते म्हणाले.

यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांसह रेल्वेमंत्री पियूष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही देशांच्या रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

बुलेट ट्रेनचे उद्घाटन मुंबईत करा – मुख्यमंत्री

बुलेट ट्रेनचे भूमिपूजन अहमदाबादेत झाले. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर त्याचे उद्घाटन मुंबईत करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

जपानच्या लोकांचे आयुष्य बदलले – आबे

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी ‘नमस्कार’ म्हणून भाषणाला सुरुवात केली आणि ‘धन्यवाद’ म्हणत भाषणाचा समारोप केला. 1965 मध्ये जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरू झाली. या बुलेट ट्रेनमुळे जपानची अर्थव्यवस्था आणि लोकांचे आयुष्य बदलून गेले. शहरांतील अंतर कमी झाले. ही सर्वांत सुरक्षित सेवा असून, आजपर्यंत एकही अपघात बुलेट ट्रेनला झालेला नाही असे पंतप्रधान आबे यांनी सांगितले. जपानमधील ‘ज’ आणि इंडियातील ‘इ’ मिळून ‘जय’ हा शब्द तयार होतो असे सांगतानाच आबे यांनी ‘जय जपान, जय इंडिया’चा नारा दिला. दोन्ही देशांमधील मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जात असून, हिंद आणि प्रशांत हिंदमहासागराचा हा संगम आहे असे आबे म्हणाले.

मुंबई, पठाणकोट हल्ल्यातील दोषींना शिक्षा करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी संयुक्त निवेदनात दहशतवादाविरुद्ध लढाईत हिंदुस्थान आणि जपान एकत्र असल्याचे म्हटले आहे. अल-कायदा, इसिस, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी पाकिस्तानलाही फटकारण्यात आले आहे. मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला आणि पठाणकोटवरील हल्ल्यातील दोषींवर पाकिस्तानने कारवाई करून शिक्षा ठोठवावी अशी मागणी केली आहे.
15 करारांवर स्वाक्षऱ्या

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान आबे यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही देशांतील 15 करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. अणुऊर्जेचा नागरी वापरासाठी करार करण्यात आला.

क्लीन एनर्जी आणि क्लायमेंट चेंज व्यापार आणि उद्योगवाढीचाही करार झाला.

हिंदुस्थानात येणाऱया जपानी नागरिकांची संख्या वाढली आहे. आता इंडिया पोस्ट आणि जपान पोस्टच्या मदतीने जपानमधून आवडत्या डीश मागवता येतील.

जपानी कंपन्यांची संख्या वाढत आहे. जपानी मनुष्यबळही वाढतेय. त्यामुळे हिंदुस्थानात जपानी रेस्टॉरंट उघडणार.