जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, आमदारकीचा राजीनामा देणार

225

सामना ऑनलाईन, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आहेत. आपण आज विधानसभा अध्यक्षांना भेटून आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं क्षीरसागर यांनी म्हटले आहे. हा राजीनामा दिल्यानंतर आजच म्हणजे बुधवारी मी शिवसेनेत प्रवेश करणार आहे असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीतील राष्ट्रवाद संपला – आमदार जयदत्त क्षीरसागर

जयदत्त क्षीरसागर हे गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. या अस्वस्थतेबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना क्षीरसागर म्हणाले की ‘वादळात ज्या दिव्याचं संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे हात त्या दिव्याभोवती धरले त्याच दिव्यामुळे हात पोळायला लागले तर काय करायचे? ‘

लोकसभा निवडणुकीचे 23 मे रोजी म्हणजे उद्या निकाल लागणार आहेत. एक्झिट पोलमुळे विरोधकांच्या गोटामध्ये चिंता पसरलेली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला क्षीरसागर यांनी हादरा दिला आहे. या हादऱ्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला दीर्घकाळासाठी सहन करावे लागतील असे बीड जिल्ह्यामध्ये बोलले जात आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपण आपल्या घुसमटीबाबत चर्चा केली होती असं सांगितलं. ‘ज्या चुका होत आहेत त्या दुरुस्त होतील अशी अपेक्षा होती मात्र काही घडले नाही’ असे क्षीरसागर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांची संपूर्ण ताकद महायुतीसाठी पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या. केजमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्यासाठी त्यांनी 15 एप्रिल रोजी सभा घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. मी राष्ट्रवादीला बाजूला सारले आणि राष्ट्रवादाला जवळ केले. जेथे जातो तेथे प्रामाणिकपणे काम करत असतो. राष्ट्रवादीत ही निष्ठेने काम केले पदरात काय पडलं, असा सवाल उपस्थित करून आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. बीड जिल्ह्यात घडळाची टिकटिक आता बंद होणार राष्ट्रवादाला बळ मिळणार असे क्षीरसागर या सभेत म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या