जैन इरिगेशनने कमी दर देऊनही डावलण्याचा घाट

सामना प्रतिनिधी, पुणे

शहरातील बहुचर्चित २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या एका निविदेमध्ये जैन इरिगेशन कंपनीने सर्वात कमी दर देण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. सहा निविदा एल अ‍ॅण्ड टी कंपनीला देण्याचा घाट प्रशासनाने घातलेला असून, यासंदर्भातला प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पालिकेकडून राबविण्यात येणाNया चोवीस तास पाणीपुरवठा योजना कायमच वादात राहिली आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनसुद्धा विशिष्ट कंपनीला प्रशासन अधिक महत्त्व देत असल्याचे समोर आले आहे. सहा निविदा एल अ‍ॅण्ड टी कंपनीला देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे तीनपेक्षा अधिक निविदा एका कंपनीला देऊ नयेत, अशी अट असतानासुद्धा अशाप्रकारे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

चोवीस तास पाणी योजनेमध्ये पाइपलाइन टाकणे, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेन्टेनन्स असे सहा भाग करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. सुमारे २३१५ कोटींचा हा प्रकल्प असून २०५० कोटींच्या निविदा प्रशासनाला मिळाल्या आहेत. सरासरी १० ते १२ टक्के कमी दराने कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. सहाही भागात एल अ‍ॅण्ड टी कंपनीच्याच कमी दराच्या निविदा आल्या आहेत. निविदेमधील अटीनुसार एकाच कंपनीला सहा निविदा देता येणार नाहीत. असे झाल्यास एकाच कंपनीची मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता आहे. चोवीस तास पाणी योजनेतील पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडे आहे. सर्वच कामे एका कंपनीला मिळाल्यास मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जैन इरिगेशन या कंपनीने सर्वात कमी दराने काम करण्यास तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे हे काम एल अ‍ॅण्ड टीपेक्षा दहा लाख रुपयांनी कमी रकमेत करण्यास तयार आहे. त्यासंदर्भातले पत्र महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. असे असताना आयुक्त मात्र सर्व काम एल अ‍ॅण्ड टी कंपनीला देण्यावर पालिका प्रशासन ठाम आहे