महापालिकेचा कर बुडवणाऱ्यांच्या घरासमोर डफ वाजवून 23 लाखांचा कर कसूल

9


सामना प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेने कराचा भरणा न करणाऱ्यांच्या घरासमोर शुक्रवारपासून ‘डफ’ वाजवायला सुरुवात केल्यानंतर थकबाकीदारांना धडकी भरली आहे. पहिल्याच दिवशी शहरातील 13 मालमत्तांना सील ठोकण्यात आले, तर जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी 32 जणांनी तब्बल 23 लाखांचा भरणा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच महापालिकेने मोठय़ा थकबाकीदारांची यादी जाहीर केली होती. चौकाचौकांत होर्डिंग लावल्यानंतर अनेक थकबाकीदारांनी पैसे भरायला सुरुवात केली होती. परंतु त्यानंतरही काही थकबाकीदारांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे शुक्रवारपासून थकबाकीदारांच्या घरासमोर वाद्य वाजवण्याचे ठरवले आणि त्याचा परिणामदेखील दिवसभरात अनुभवला. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासून थकबाकीदारांची यादी सोबत नेत पथकांनी प्रभागनिहाय मोठय़ा थकबाकीदारांचे घर गाठले. सोबत ‘डफ’ वाजवणारा होताच. घरासमोर अचानक वाद्य वाजायला सुरुवात झाल्यानंतर थकबाकीदार मालमत्ताधारकांनी पालिकेच्या पथकाला वाद्य बंद करण्याची विनंती केली. काहींनी वाददेखील घातला. परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने वाद्य वाजवणे सुरूच होते.

काही ठिकाणी आजूबाजूच्या रहिवाशांनी मालमत्ताधारकांना विचारणादेखील केली. तेव्हा मात्र थकबाकीदारांकर नामुष्की ओढवली होती. घर बंद करूनही जाता येत नसल्याने अनेकांची नाकाबंदी झाल्याची स्थिती होती. पालिकेने शुक्रवारी राबवलेल्या मोहिमेत 13 मालमत्तांना सील ठोकले आहे. यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये 11 तसेच प्रभाग 3 मध्ये 2 मालमत्तांना कुलूप लाकले. या 13 मालमत्ताधारकांकडे 1 कोटी 44 लाख 84 हजार 470 रुपये थकबाकी आहे. 32 लोकांनी 23 लाख 14 हजार 910 रुपये भरले. प्रभाग 1 मध्ये 7 जणांनी 7 लाख 44 हजार 631 रुपये, प्रभाग 2 मध्ये 7 जणांनी 1 लाख 16 हजार 423 रुपये, प्रभाग 3 मध्ये 8 जणांनी 4 लाख 12 हजार 77 रुपये, प्रभाग 4 मध्ये 10 जणांनी 10 लाख 41 हजार रुपये भरले.

आपली प्रतिक्रिया द्या