शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त जळगावात क्रिकेट व कबड्डी स्पर्धा

4

सामना प्रतिनिधी । जळगाव

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जळगावात शिवसेनेतर्फे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत. 21 ते 23 जानेवारीदरम्यान या स्पर्धा होणार असल्याची माहिती महापालिकेचे विरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन व शिवसेना जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पद्मालय विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत महाजन व तायडे म्हणाले की, शिवतीर्थ मैदानावर 21 ते 23 जानेवारीदरम्यान जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत मुलांच्या गटात 24 तर मुलींच्या गटात 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धा मॅटवर घेतल्या जाणार आहेत. तर एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होणार असून या स्पर्धेत मुंबई, नाशिक, मालेगाव, जालना येथील संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते होणार आहे. या प्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार आर.ओ. पाटील, आमदार किशोर पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने बिगमार्टपासून टॉवर चौक व शिवतीर्थ मैदानापर्यंत खेळाडूंची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.