जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेच्या आक्रमणाने सत्ताधारी भाजप घायाळ

2

सामना प्रतिनिधी । जळगाव 

गाळेधारकांच्या विषयावरुन जळगाव महापालिकेच्या आज झालेल्या नुतन पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीतील पहिल्याच महासभेत शिवसेनेच्या जोरदार आक्रमणाने सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी पुरते घायाळ झाले. शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे भाजप गटनेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे येणारा काळ सत्ताधार्‍यांसाठी कसोटीचा असेल याची प्रचिती आज दिसून आली.

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिलीच महासभा पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुभाष मराठे उपस्थित होते.  यावेळी शिवसेना गटनेतेपदी अनंत जोशी, विरोधी पक्षनेतेपदी सुनील महाजन, भाजप गटनेतेपदी भगत बालाणी, सभागृहनेतेपदी ललित कोल्हे, एमआयएम नेतेपदी रियाज बागवान यांची निवड जाहीर करण्यात आली.

स्थायी समिती सदस्य निवड

स्थायी समितीचे सदस्य म्हणून भाजपातर्फे भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, सुचिता हाडा, उज्वला बेंडाळे, प्रवीण कोल्हे, दिलीप पोकळे, सुनील खडके, चेतन सनकत, सुरेश सोनवणे, मयूर कापसे, प्रतिभा पाटील, जितेंद्र मराठे यांचा समावेश आहे. तर शिवसेनेतर्फे नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नितीन बर्डे तर एमआयएमचे रियाज बागवान यांची निवड करण्यात आली.

महिला बालकल्याण समिती सदस्य निवड

महिला व बालकल्याण समितीमध्ये सदस्य म्हणून रेश्मा काळे, शोभा बारी, मंगला चौधरी, रुकसाना खान, सरिता नेरकर, सुरेखा तायडे, ज्योती तायडे, जयश्री महाजन यांचा समावेश आहे.

गाळेधारकांच्या विषयावर शिवसेनेचे आव्हान

महासभेत गाळेधारकांचा विषय आल्यानंतर सत्ताधार्‍यांनी एक समिती गठीत करुन अहवाल तयार करण्यात यावा असा ठराव मांडला. यावर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते डॉ.सुनिल महाजन यांनी गाळेधारकांचा विषय न्यायप्रविष्ठ आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असे असताना समिती नेमली तर तो न्यायालयाचा अवमान नाही का असा प्रश्न उपस्थित करुन सत्ताधार्‍यांना बुचकळ्यात टाकले. हाच धागा पकडत शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी सत्ताधारी भाजप समिती नेमण्याची भूमिका घेत आहे. मात्र आयुक्तांनी दि. १५ सप्टेंबर रोजी शासनाला पाठविलेले पत्रच सभागृहात वाचून दाखवले. त्या पत्रात गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळण्यात यावे असे म्हटले आहे. या पत्रामुळे सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकार्‍यांची चांगलीच गोची झाली. यामुळे भाजप गटनेते भगत बालाणी यांचा संताप अनावर झाला. “हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ते आम्हाला चांगले माहित आहे. तुम्ही आम्हाला शिकवू नका” असे बालाणी आवेशात म्हणाले.

यावर शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी बालाणी यांना आवाहन केले की, सत्ताधार्‍यांनी गाळे धारकांच्या म्हणण्याप्रमाणे ठराव महासभेत मांडावा मी स्वतः त्या ठरावाच्या बाजूने मतदान करेन. या आवाहनाला काय उत्तर द्यावे यासाठी भाजप गटनेत्यांसह सर्वांचीच मोठी तारांबळ उडाली. कारण तसा ठराव करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान करणे होईल याची जाणीव सर्वांना असल्याने कोण काय बोलावे हेच त्यांना सुचत नव्हते. शेवटी गोंधळातच समिती नेमण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला.

विषय पटलावरील इतर विषयांना मंजुरी देण्यात आली. नवनिर्वाचित सर्व पदाधिकार्‍यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आजच्या सभेत ५७ संख्या असलेल्या भाजपावर १५ सदस्य असलेली शिवसेना भारी पडल्याचे चित्र होते.

गाळेधारकांच्या तोंडाला पाने पुसली – विरोधीपक्षनेते

आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे. असे असतांना गाळे धारकांना न्याय देऊ असे आश्वासन देवून भाजपाने मत मागितली. आता सत्तेत येऊन सुध्दा गाळेधारकांना न्याय देवू शकत नाही. आजच्या सभेत गाळेधारकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. – डॉ. सुनिल महाजन, विरोधीपक्षेनेता- शिवसेना

नितीन लढ्ढांच्या चारोळीची चर्चा

गाळेधारकांच्या विषयावर आधीच गोंधळात पडलेल्या सत्ताधार्‍यांना उद्देशून शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा म्हणाले की, “आधी होते जगवाणी, आता आले बालाणी.. तरी देखील गाळेधारकांच्या विहीरीत आले नाही पाणी..’’ असा टोला हाणला. यामुळे काय बोलावे तेच सत्ताधार्‍यांना सुचत नव्हते.