चिमुकल्यांना विहिरीत फेकून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी। परतूर

सासूबरोबर झालेल्या क्षुल्लकशा भांडणावरून जालना जिल्ह्यातील परतूर तालूक्यातील औचार कंडारी येथे एका महिलेने रागाच्या भरात आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकले. त्यानंतर तिने स्वतला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर महिला ८० टक्के भाजली आहे. सखुबाई मुळे असे तिचे नाव आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

औचार कंडारी गावात शरद मुळे हा पत्नी, आई व आपल्या दोन मुलांसह राहतो. ६ सप्टेंबर रोजी दुपारी गावातील एक व्यक्ती गावाजवळील विहीरी जवळून जात होती. त्यावेळी त्याला पाण्यावर दोन लहान बालकांचे मृतदेह तरंगतांना दिसले. त्याने ही माहिती गावातील गजाजन मुळे यास दिली. त्यांनी परतूर पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पाण्यातून काढले व पोस्टमार्टमला पाठवले. परतूर पोलीसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे.

दरम्यान, या घटनेत शरद मुळे यांच्या पत्नीने आपल्या दोन मुलांना शिवानी शरद मुळे (४) व शिवराज शरद मुळे (६) यांना रागाच्या भरात विहिरीत फेकले व स्वत:ला जाळून घेतल्याचे समोर आले आहे. तिच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरु आहेत. सासूबरोबर किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात तिने हे कृत्य केले आहे.