जम्मू-कश्मीर: दगडफेक केल्यास ५ वर्षांची शिक्षा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये दगडफेक अथवा जाळपोळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हिंसा करुन सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना थेट पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे. नुकसान करणाऱ्याकडूनच सरकार भरपाई वसूल करणार आहे. हिंसेला आळा घालण्यासाठी जम्मू-कश्मीर सरकारने काढलेल्या अध्यादेशात ही तरतूद आहे. या अध्यादेशाला राज्यपाल व्होरा यांनी मंजुरी दिली आहे.

जम्मू अँड काश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिव्हेन्शन अँड डॅमेज) दुरूस्ती विधेयक २०१७ नुसार सार्वजनिक संपत्तीशी संबंधित सर्व कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. हा अध्यादेश तात्काळ लागू करण्यात आला असून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांना आवर घालण्याचे काम या कायद्याने होणार असल्याचे जम्मू-कश्मीर सरकारने सांगितले. बंद, संप, आंदोलन आणि मोर्चा दरम्यान संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांना २ ते ५ वर्षाचा कारावास होऊ शकतो. त्याशिवाय त्यांना त्या संपत्तीची नुकसान भरपाई बाजार भावानुसार द्यावी लागणार आहे.