आजपासून कोकणातल्या आरस्पानी प्रवासाची मेजवानी!

सामना प्रतिनिधी, मुबई

कोकण मार्गावरील निसर्गाचे सौंदर्य मनमुराद न्याहाळायला मिळावे यासाठी मध्य रेल्वेने युरोपच्या ‘व्हिस्टाडोम’ धर्तीची खास पारदर्शक सफर आयोजित केली आहे. सोमवारी दादरहून सोडण्यात येणाऱ्या मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये ‘व्हिस्टाडोम’ हा आधुनिक कोच बसविण्यात आला असून त्याचे अनावरण रविवारी करण्यात आले, मात्र त्यासाठी आकारण्यात आलेले दर विमान सेवेपेक्षाही अधिक आहेत.

१८० अंशांतून आसन फिरणारी पारदर्शक व्हिस्टाडोम कशी आहे याचा पडताळा देण्यासाठी रविवारी सीएसएमटी येथे तिचा अनावरण सोहळा झाला. डब्यातील छतामधूनही निसर्ग दिसणारा हा कोच डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. खिडक्यांचा आकारही मोठा आहे. त्यामुळे या डब्यातील आसनात बसून आसमंताचा नजारा अनुभवता येतो. डब्याच्या एका टोकाला काचेचे आच्छादन असून तिथून पर्यटकांना डोंगरावरील हिरवा निसर्ग पाहता येणार आहे.

रविवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसीचे) पश्चिम विभाग समूह व्यवस्थापक अरविंद मालखेडे, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड आदी यावेळी उपस्थित होते. या डब्यास चांगला प्रतिसाद मिळत असून पुण्यासह अन्य मार्गांवर प्रवाशांकडून मागणी आल्यास त्याचा सकारात्मक विचार करू असे मत शर्मा यांनी व्यक्त केले.

वैशिष्ट्य
पारदर्शक डबा, ४० आसने, आरामदायी खुर्ची, पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा, प्रत्येक आसनाच्या मागे ९ इंच एल सीडी स्क्रीन,मोबाईल चार्ंजग, सीसी टीव्ही आदी सुविधा आहेत. बोगीच्या मध्यभागी छताला दोन स्क्रीन असून यात जीपीएसही पुरविले आहे.

वेळापत्रक
पारदर्शक डबा असलेली ही गाडी पावसाळ्यापर्यंत दादरहून १८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबरपर्यंत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सुटेल. परतीच्या मार्गावर १९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मंगळवार, शुक्रवार व रविवारी धावेल. पावसानंतर ही गाडी आठवड्यातून सहा दिवस (बुधवार सोडून) धावेल.

स्थानके आणि तिकीट दर
दादर ते पनवेल – ६३० रु., दादर ते चिपळूण- १२१५ रु., दादर ते रत्नागिरी – १४८० रु., दादर ते कणकवली – १८७० रु., दादर ते कुडाळ – १९५० रु., दादर ते थिविम – २१२० रु., दादर ते मडगाव – २२३५ रु., पनवेल ते चिपळूण – १०७५ रु., पनवेल ते रत्नगिरी – ११३० रु., पनवेल ते कणकवली- १७५० रु., पनवेल ते कुडाळ -१८२५ रु., पनवेल ते थिविम- १९९५ रु., पनवेल ते मडगाव-२२३५ रु.