हजारो पर्यटक निराश होऊन परतले, जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप

84

सामना ऑनलाईन । मुरुड

राज्याच्या विविध भागांतून आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून हजारो पर्यटकांनी जंजिरा किल्ल्याकडे कूच केले. लहान मुलांपासून ते तरुण आणि आजी-आजोबांच्या मनातही किल्ल्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. पण प्रत्यक्षात किल्ल्याच्या प्रवेशद्वारालाच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱयांनी कुलूप लावल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. हजारोजण निराश होऊन परतले. प्रवेशद्वाराला कुलूप का लावले याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुरुड-जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आज पुणे-मुंबईसह संभाजीनगर, सांगली, पंढरपूर आदी विविध भागांतून पर्यटक आले होते. मात्र कुलूप बघून त्यांची घोर निराशा झाली. दरवर्षी 15 जूनच्या सुमारास मुरुड- जंजिरा किल्ल्याला पावसामुळे कुलूप लावण्यात येते. मात्र यावर्षी तब्बल 20 दिवस आधी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले गेले. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. सुट्टय़ांचा हंगाम असल्याने पर्यटकांनी आज गर्दी केली होती पण सर्वांचीच निराशा झाली.

आदेश कुणी दिले?
पावसाळा सुरू होण्यास अजून अवकाश असतानादेखील जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याचे आदेश कुणी दिले, असा सवाल ग्रामस्थांनी तसेच स्थानिक व्यावसायिकांनी केला आहे. जंजिरा-पर्यटक संस्थेचे अध्यक्ष इस्माईल आदम यांनी याबाबत थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत संबंधित अधिकाऱयांशी संपर्क साधला असता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला कुणी कुलूप लावले याची आपणास माहितीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या