भाजपला सत्तेचा गर्व, महादेव जानकर यांचा कमळाबाईला इशारा

जामखेड – राज्यात झालेल्या सत्ताबदलामध्ये मित्रपक्षांचा सिंहाचा वाटा आहे, हे भाजपवाले विसरले आहेत. त्यांना सत्तेचा गर्व चढला आहे. तुम्ही दोघे-चौघे आहात म्हणून आम्हाला हिणवतात; पण आमच्यामुळेच सत्तेत आहेत. तुम्ही आमची औकात काढू नका, नाहीतर तुमची जिरविण्यासाठी सत्तेची झूल फेकून देऊ, असा इशारा राज्याचे दुग्धविकास, मत्स्य मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला.

राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम संघटनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ महादेव जानकर यांनी जामखेडमध्ये वाढविला. यावेळी ते म्हणाले, आमचे दैवत गोपीनाथ मुंडे. त्यांच्यामुळेच आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ते नाहीत म्हणून आमची परवड करू नका. मी चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी ब्रम्हचारी असून, मला कशाचीही हाव नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत. भ्रष्ट काँगेस-राष्ट्रवादी नको म्हणून आम्ही तुम्हाला जवळ केले. माझा पक्ष राज्यातच नव्हे; तर देशात आहे. आमचा मान ठेवा, असे जानकर यांनी सांगितले. जामखेड नगरपरिषदेमध्ये माझा एकही उमेदवार निवडून आला नाही; पण डरकाळ्या फोडणाऱयाला खाली बसवले, यातच माझा विजय झाला, असे पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता जानकर यांनी टीका करताच टाळय़ांचा कडकडाट झाला.