जपानची चालकरहित बुलेट ट्रेन अतिसुसाट

1

सामना प्रतिनिधी । फुकुओका

चीनने ताशी 430 किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन आणल्यानंतर येत्या काही वर्षांत जपानची ताशी 500 किमी वेगाने धावणारी चालकरहित बुलेट ट्रेन सुसाट जाणार आहे. मॅगलेव्ह ही बुलेट ट्रेन 2027 सालापर्यंत जपानच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत दाखल होईल.

सर्वात वेगवान बुलेट ट्रेनविषयी सेंट्रल जपान रेल्वे कंपनीचे डेप्युटी मॅनेजर ताकातोशी शिशिडो सोमवारी माहिती दिली. पहिल्या टप्प्यात चुओ शिन्कानसेन जपानमधील तीन प्रमुख शहरांना जोडेल. टोकियो आणि नागोया हे  286 किमीचे अंतर 40 मिनिटांत कापेल. हा मार्ग पुढे कयोटो आणि ओसाका शहरांपर्यंत 2045 सालामध्ये जाईल. भविष्यात ही बुलेट ट्रेन तीन शहरांना 67 मिनिटांत जोडेल. पूर्णपणे ऍल्युमिनयमपासून बनवलेली ही बुलेट ट्रेन 40 मीटर लांब आहे. या सर्वाधिक जलद बुलेट ट्रेनचे तंत्र चीनपेक्षा खूप वेगळे असल्याचा दावा ताकातोशी शिशिडो यांनी केला. जपानी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प साकारत आहोत, या माध्यमातून चीनसोबत कोणतीही स्पर्धा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. टोकियो आणि ओसाका हा सर्वात  गर्दीचा आणि जुना मार्ग असल्याचेही त्यांनी सांगितले.