आजोबांनी १० वर्ष उपाशी ठेवलं, नातीचा झाला सापळा

सामना ऑनलाईन । टोकियो

जपानमधील एका महिलेचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये महिलेच्या अंगावर फक्त आणि फक्त हाडं दिसत आहेत. पीडित महिलेनं आपल्या आजोबांवर तब्बल १० वर्ष उपाशी ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. ‘द सन’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वृत्तानुसार, जपानमध्ये एका महिलेने आपले हाडांचा सापळा झालेले फोटो शेअर केले आहेत. पीडित महिलेनं दावा केला आहे की आजोबांनी मागील १० वर्षापासून उपाशी ठेवल्यानं तिचं वजन १६ किलो ८०० ग्रॅम झालं आहे. पोलिसांनी अत्यंत धडाडीची कामगिरी करत पीडित महिलेची सोडवणूक केली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडितेला रुग्णालयात पोहोचण्यास आणखी उशीर झाला असता तर तिचा मृत्यू झाला असता असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आजोबा तिला उपाशी ठेवत असत आणि कधी कोणती वस्तू चोरून-लपून खाण्याचा प्रयत्न केला तरी आजोबा पोटातील अन्न उलटीवाटे बाहेर पडेपर्यंत पोटावर लाथांचा मारा करत असत. याबाबत पीडितेने ट्विटरवर वाइल्ड कॅवेड नावाने पोस्ट केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, ज्या लोकांसोबत दुर्व्यवहार केला जातो त्यापेक्षा हे प्रकरण वेगळं आहे. तुम्हाला खाण्याचा कोणताही आजार असल्याचे उशीर होण्यापेक्षा कोणाकडे तरी मदत मागा. मात्र या बातमीमध्ये किती तथ्य आहे याबाबत ‘द सन’ने कोणतीही माहिती दिलेली नाही.