अझानच्या मुद्द्यावरून जावेद अख्तर यांनी दिला सोनू निगमला पाठिंबा

सामना ऑनलाईन । मुंबई

पहाटे मशिदीवरून वाजणाऱ्या भोंग्याविरोधात गायक सोनू निगमने आवाज उठविल्यानंतर आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील अझानविरोधात भूमिका घेतली आहे. अख्तर यांनी अझानविरोधातील सोनू निगमच्या भूमिकेला तब्बल आठ महिन्यानंतर पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विट करत मशिदीतील अझानसाठी लाऊडस्पीकरची गरज नसल्याचे म्हटले आहे.

“मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेणाऱ्यांशी मी पूर्णपणे सहमत आहे. यात सोनू निगमचाही समावेश आहे. मशिदीतील अझानसाठी लाऊडस्पीकर वापरण्याची काहीही गरज नाही. नागरी भागात असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळी लाऊडस्पिकर वापरला जाऊ नये”, असे जावेद अख्तर यांनी ट्विट केले आहे.

एप्रिल २०१७ मध्ये गायक सोनू निगमने त्याच्या घराजवळ वाजणाऱ्या अझानविरोधात ट्विट केले होते.”देव सर्वांचे भले करो. मी मुसलमान नाही पण तरीही दररोज मला पहाटे अझानच्या आवाजाने उठावे लागते. एखाद्यावर जबरदस्तीने धार्मिकता लादण्याचा हा प्रकार कधी बंद होणार?, असा प्रश्न सोनू निगमने केले होते. त्याच्या या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही मौलवींनी सोनू निगमचं टक्कल करणाऱ्याला १० लाखांचं बक्षिस जाहीर केले होते. मात्र सोनू निगमनं स्वत:च मुंडन करून मौलवीने आता दहा लाख रुपये आणुन द्यावे असे आवाहन केले होते.