जवखेडे तिहेरी हत्याकांड : आरोपीच्या वकिलांना दंड

2

सामना प्रतिनिधी । नगर

जवखेडे तिहेरी हत्याकांडातील बचाव पक्षाला साक्ष देण्यास मुदतवाढ मागितल्याप्रकरणी न्यायालयाने तीन हजार रुपये दंड सुनावला. आरोपीच्या वकिलांनी माझ्यामुळे हा दंड झाल्याने मी स्वतः दंड भरत असल्याचे न्यायालयात सांगितले.

जवखेडे हत्याकांडाची सुनावणी नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय सुरू आहे. मंगळवारी या खटल्याची सुनावणी होती. एका वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष घेण्यात येणार होती. पुण्यातील वैद्यकीय अधिकारी त्यासाठी नगरला आले होते. आरोपींच्या वकिलाने ही साक्ष पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यासाठी तयारी झाली नसल्याचे कारण दिले होते. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी आरोपीच्या वकिलांच्या मागणीवर जोरदार आक्षेप घेतला. साक्षीदार न्यायालयात सुनावणीसाठी आले आहेत. त्यांच्याकडे हजारो पोस्टमॉर्टम होत असतात. त्यामुळे एका केससाठी वारंवार त्यांना पुण्यातून येणे परवडणारे नाही. त्यामुळे बचाव पक्षाने त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून बचाव पक्षाला तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. माझ्यामुळे हा दंड झाला आहे, असे म्हणून ही रक्कम मी स्वतः देतो, असे आरोपीचे वकील सुनील मगरे यांनी न्यायालयासमोर सांगितले.

काय आहे जवखेडे हत्याकांड
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावात एकाच कुटुंबातील तिघांची ‘नाजूक’ कारणातून तिघांची हत्या केली होती. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून कुपनलिका व विहिरीत टाकले होते. हा खून केल्याप्रकरणी मयतांच्या कुटुंबातीलच तिघांना, जवळच्या नातेवाईकांना अटक करण्यात आलेली आहे. हे प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले होते.