अकोल्याचा जवान सुमेध गवई शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीर खोऱयात पुन्हा जवानांचे रक्त सांडले. शोपिया जिह्यातील अवनुरा गावात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढा देताना महाराष्ट्राच्या वीरपुत्रासह दोन जवान शहीद झाले. सुमेध गवई, इलयाराजा अशी शहीदांची नावे असून गवई हा महाराष्ट्रातील अकोला जिह्यातील आहे. दरम्यान, तब्बल 18 तास चाललेल्या या धुमश्चक्रीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालत हिजबुलला दणका दिला.

खात्मा झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून आदील मलिक (शोपिया), इरफान उल हक शेख (शोपिया) आणि उमर माजिद शेख (कुलगाम) अशी यांची नावे आहेत. दरम्यान, चकमक सुरू असताना सुरक्षेचा वेढा तोडून एका दहशतवाद्याने पोबारा केला. शनिवारी रात्री उडालेली चकमक 18 तासांनंतर थांबली. यात दोन जवान शहीद झाले, तर एका अधिकाऱयासह चार जवान जखमी झाले आहेत. त्यांना 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी दिली.

मुलाचा सार्थ अभिमान

सुमेधच्या वीरमरणाने लोणाग्रा गावावर शोककळा पसरली आहे. चार वर्षांपूर्वी सुमेध लष्करात दाखल झाले होते. त्यांचा लहान भाऊसुद्धा लष्करात आहे. सुमेध यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. मुलगा गेल्याचे दुŠख आहे, पण तो देशासाठी शहीद झाला याचा सार्थ अभिमान आहे असे सांगताना सुमेध यांचे वडील वामनराव गवई यांना अश्रू अनावर झाले.

हिजबुलचा कमांडर यासिन इत्तूला कंठस्नान

हिंदुस्थानी लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर यासिन इत्तू याला यमसदनी धाडले आहे. बुरहान वाणी आणि अबू दुजानाला ठार केल्यानंतरची कश्मीर खोऱयातील सुरक्षा दलाची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. इत्तू हा बुरहानचा निकटचा साथीदार होता. महमूद गझनवी या नावानेदेखील तो प्रसिद्ध होता.
कश्मीरमधून दहशतवाद्यांचा खात्मा करणे हेच सरकारचे ध्येय आहे. लष्कराच्या कारवाईमुळे दहशतवादी कश्मीरमधून जीव मुठीत घेऊन पळ काढत आहेत. तसेच नोटाबंदीनंतर दहशतवाद्यांची रसद तुटली आहे.
– अरुण जेटली, संरक्षण मंत्री

16 जूनला अचबल भागात हल्ल्यात सहा पोलीस शहीद.

15 जूनला दोन दहशतवादी हल्ल्यांत दोन जवान शहीद.

13 जूनला एकाच वेळी सहा दहशतवादी हल्ले.