कर्नाटकात भाजपला ‘सौम्य’ नाही जबर धक्का

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकमधल्या बंगळुरू येथील जयानगर मतदारसंघामध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला जबरदस्त धक्का देत पराभव केला आहे. १६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाल्यानंतर काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांनी भाजपच्या बी एन प्रल्हाद यांचा काही मतांनी पराभव केला आहे. जेडीएसने ऐनवेळी माघार घेत काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळेही ही लढत काँग्रेस विरूद्ध भाजप अशी झाली व त्याचा काँग्रेसला फायदा झाला.

भाजपचे उमेदवार बी. एन विजयकुमार यांचे ४ मे रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळेच सोमवारी या जयानगर मतदारसंघात निवडणूक झाली. एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या जागेसाठी काँग्रेसने रामालिंगा रेड्डी यांची मुलगी सौम्या रेड्डीला उमेदवारी दिली. तर भाजपकडून पक्षाचे दिवंगत उमेदवार बी एन विजय कुमार यांचे छोटे बंधू बी एन प्रल्हाद यांना उमेदवारी देण्यात आली होती. ११ जून रोजी झालेल्या मतदानात ५५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. या जागेसाठी २१६ मतदार केंद्रांमध्ये मतदान झाले होते. सौम्या यांच्या विजयामुळे भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.