जयंत नारळीकर, रामदास भटकळ यांना वाङ्मय पुरस्कार

सामना ऑनलाईन,मुंबई

मराठीतील उत्कृष्ट वाङ्मयीन निर्मितीस देण्यात येणारे राज्य शासनाचे ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2017’ गुरुवारी जाहीर झाले. पुरस्कार विजेत्यांमध्ये जयंत नारळीकर, रामदास भटकळ, इरावती कर्णिक, कृष्णात खोत, मृदुला बेळे आदी 32 साहित्यिकांचा समावेश आहे.

प्रौढ वाङ्मय-काव्यासाठी देण्यात येणारा कवी केशवसुत पुरस्कार शशिकांत हिंगोणेकर यांच्या ‘ऋतुपर्व’ पुस्तकाला तर बहिणाबाई चौधरी पुरस्कार अमृत तेलंग यांच्या ‘पुन्हा फुटतो भादवा’ला मिळालाय. नाटकासाठी देण्यात येणारा राम गणेश गडकरी पुरस्कार आशुतोष पोतदार यांच्या ‘एफ 1/105 आणि सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ या नाटकास मिळाला आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्या ‘गणित आणि विज्ञान-युगायुगांची जुगलबंदी’ पुस्तकाला महात्मा जोतिराव फुले पुरस्कार मिळालाय. हरी नारायण आपटे पुरस्कार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगण’, ललितगद्यसाठीचा अनंत काणेकर पुरस्कार इरावती कर्णिक यांच्या ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत’ याला जाहीर झाला आहे. ‘इंडियन होम रुल हिंद स्वराज’ या रामदास भटकळ यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार प्राप्त झालाय. सुधीर महाबळ यांच्या ‘परतवारी’ या ललितगद्यचा ताराबाई शिंदे पुरस्कार मिळालाय. ऍड. निशा शिवूरकर यांच्या ‘लढा टाकलेल्या स्त्रियांचा’ या पुस्तकालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झालाय. प्रौढ वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये तर प्रथम प्रकाशन पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रुपये असे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या