अन्नपूर्णाची ‘जयंती’!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

ही कथा ‘अन्नपूर्णा जयंती’ची नाही, तर `जयंती’ नावाच्या अन्नपूर्णेची आहे! जयंती कठाळे ही ३८ वर्षांची महिला नऊवार नेसून बंगळुरू येथे `पूर्णब्रह्म’ नावाचे मराठमोळे शुद्ध शाकाहारी उपहारगृह चालवत आहे. `पिझ्झा’, `बर्गर’ सारख्या परदेशी खाद्यपदार्थाच्या १८,००० शाखा चालू शकतात, तर देशी खाद्यपदार्थाच्या किमान ५००० तरी शाखा जगभरात चालल्या पाहिजेत, हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी खाद्यव्यवसायात स्वत:ला झोकून दिले आहे.

जयंती कठाळे ह्या मूळच्या नागपुरच्या आणि आयटी क्षेत्रातल्या. नोकरीनिमित्त देशोदेशी प्रवास करत १४ वर्षांपूर्वी त्या बंगळुरुत सपरिवार स्थायिक झाल्या. अमराठी शहरात, देशात मराठमोळ्या पदार्थांच्या आठवणीने त्या व्याकुळ होत असत. एकदा तर २७ तासांचा विमान प्रवास त्यांना शाकाहारी जेवणाअभावी बे्रड-बटर खाऊन करावा लागला. विशेषत: ह्या प्रसंगानंतर त्यांना खाद्यक्षेत्र व्यवसायात उतरावे असे प्रकर्षाने वाटू लागले.

जयंती ह्यांचा जन्म संयुक्त कुटुंबातला. घरात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात असूनही, आजीची मदतनीस म्हणून जयंती स्वत: हजेरी लावत असत. आजीच्या हाताखाली त्यांनी चटणीपासून पुरणपोळीपर्यंत सर्व पदार्थ शिकून घेतले. सरावाने हाताला चव आली होती. मराठमोळे पदार्थ खाण्याची आणि खिलवण्याची आवड असल्यामुळे त्यांनी बंगळुरुतल्या अमराठी लोकांनाच काय, तर परदेशातल्या फिरंग्यांनाही पुरणपोळीची गोडी लावली. ह्यातूनच त्यांनी आपली नोकरी सांभाळून उत्सवप्रसंगी पुरणपोळी आणि मोदक करून विकण्यास सुरुवात केली. तेव्हा `ऑर्कुट” ह्या सोशल माध्यमाचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, व्यावसायिकतेची बीजे रुजण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याला अंकुर फुटला, तो २०१२ मध्ये, `पूर्णब्रह्म’ ह्या उपाहारगृहाच्या स्वरूपात!

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याचे संस्कार आपल्यावर बालपणापासून घातले जातात. त्यातही मराठमोळ्या शाकाहारी थाळीत खारटापासून तुरटापर्यंत सर्व चवींच्या पदार्थांचा समावेश असतो, म्हणून मराठमोळी थाळी हे पूर्णान्न आहे’, असे जयंती सांगतात. ह्याच विचारातून त्यांनी आपल्या उपाहारगृहाला `पूर्णब्रह्म’ हे नाव दिले. सुरुवातीला दोन सहकाऱ्यांच्या मदतीने छोटेसे रेस्टॉरंट सुरु केले. लोकांचा प्रतिसाद वाढू लागला, तशी जागेची उणीव भासू लागली. काही काळातच त्यांनी बेंगळुरूमधील एचएसआर ह्या उच्चभ्रू भागामध्ये ५७०० चौरस फूट जागेत `पूर्णब्रह्म’चे आलिशान उपाहारगृह थाटले. ते आता बेंगळुरूमधील मराठी पदार्थ देणारे उत्तम दर्जाचे उपहारगृह म्हणून ओळखले जात आहे.
हे यश एका रात्रीतले नाही, तर ह्यामागे जयंती आणि त्यांच्या साथीदारांची कंबरतोड मेहनत आहे. पूर्णब्रह्मची स्थापना करण्यापूर्वी जयंती ह्यांनी सहा महिने बंगळुरूतील छोट्या-मोठ्या प्रत्येक उपहारगृहात जाऊन तिथल्या परिस्थितीचा, पदार्थांचा, सेवेचा, दराचा, गुणवत्तेचा बारकाईने अभ्यास केला. पदार्थांची गरज लक्षात घेतली. महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांत जाऊन तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची चव चाखली. आपल्याला ग्राहकांना वेगळे काय देता येईल? अमराठी माणसाला मराठी पदार्थांकडे आकर्षून कसे घेता येईल? इ. गोष्टींचा अभ्यास केला. मित्रपरिवाराचा सल्ला घेतला आणि त्यातून सगळे ठोकताळे निश्चित करून प्रत्येक गोष्टीचा आकृतीबंध तयार केला.

ह्या उपक्रमात जयंती ह्यांना मोलाची साथ लाभली, ती त्यांचा बालमित्र मनिष शिरासव ह्यांची! तेही आयटी क्षेत्रातले आणि खवय्ये असल्यामुळे त्यांनाही सारख्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. जयंती ह्यांनी `पूर्णब्रह्म’चा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, तेव्हा त्यांनी आनंदाने होकार दिला आणि तेव्हापासून ते त्यांच्यासोबत प्रत्येक निर्णयात भक्कमपणे उभे राहिले. याबाबत शिरासव सांगतात, `आमच्यापैकी कोणालाही हॉटेल इंडस्ट्रीचा पूर्वानुभव नव्हता, जे एकार्थी चांगले झाले. आम्ही सगळ्या गोष्टी अभ्यासातून, अनुभवातून उभ्या केल्या. जसे की, इतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना ग्राहकांचे जेवण झाले की, जेवायला वाढले जाते़ याउलट आमचा कामगार सकाळी ११ वाजता पोटभर जेवतो. कामात असताना पाणी प्यायलाही त्यांना सवड नसते, म्हणून एक मुलगा दर तासाला पाणी पाजण्यासाठी नियुक्त केला आहे. ऑर्डर सर्व्ह करेपर्यंत आमचे छोटे ग्राहक, म्हणजेच बच्चे कंपनी कंटाळू नये, म्हणून आम्ही त्यांना रंग आणि कागद देतो आणि त्यांनी काढलेली चित्रे हॉटेलच्या फलकावर झळकवतो. ह्या छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठा आनंद मिळवणे, हेच आमचे उद्दीष्ट आहे. आमच्यपैकी कोणीही हॉटेल व्यवसायाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहत नाही, तर ह्या माध्यमातून आपण एक चांगला उपक्रम राबवतोय आणि जो अनेकांना रोजगार मिळवून देतोय, ह्याचेच आम्हाला समाधान आहे.’

`पूर्णब्रह्म’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महिलांना प्राधान्य दिले जाते. कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के महिला आहेत. इतर क्षेत्रांप्रमाणे पगाराच्या बाबतीत स्त्री-पुरुष ह्यांच्या पगारात भेदभाव केला जात नाही. फ्रँचायझी देतानाही महिलांना प्राधान्य देण्याकडे जयंती ह्यांचा कल असतो. त्यांच्या मते, `प्रत्येक महिला ही अन्नपूर्णा आहे. तिच्या कलेला ह्या निमित्ताने मोठे व्यासपीठ आणि त्यातून उत्पन्न मिळवून देणे, हे पूर्णब्रह्मचे उद्दिष्ट आहे!’

नवीन शहरात विंâवा देशात जाऊन आपली संस्कृती रुजवणे सोपे नसते. ते शक्य होते, ते केवळ प्रबळ महत्त्वाकांक्षेच्या जोरावर आणि हे जयंती ह्यांनी सिद्ध करून दाखवले. ह्या अनुभवाबद्दल जयंती सांगतात, `अमराठी लोकांना जेवणाच्या चवीत नवनवीन बदल करून बघायला आवडते, ही आमच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. त्यांना मिसळ-पाव, पाटवड्यांचा रस्सा-भाकरी वाढताना, तो पदार्थ कसा खातात, हे सांगण्यासाठीही आमचा प्रतिनिधी मार्गदर्शन करतो. कारण, मुळात हे त्यांचे खाद्य नाही, त्यामुळे त्यांना ते कसे खायचे हे सांगणे क्रमप्राप्त होते. गमतीची बाब म्हणजे, ग्राहकांना मार्गदर्शन करणारी मंडळीही अमराठी असल्याने सुरुवातीला आम्हाला त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागली. बहुतेकांना `हिंदी’ देखील बोलता येत नव्हते. खाणा-खुणांतून आमचे संवाद होत असत. रस्सम करणारे हात, वरणाला फोडणी घालण्यासाठी सरसावत असत, त्यांना वरण-भात-तूप-लिंबू अशीच मराठी डिश असते, हे निक्षून सांगावे लागे. मात्र, आता तीच मंडळी खमंग पुरणपोळी आणि तर्रीदार झणझणीत मिसळ बनवायला शिकली आहेत.’

पुडाची वडी, साबुदाणा खिचडी, वडा पाव, साबुदाणा वडा, पुरणपोळी, कटलेट, पुरी भाजी, थालीपीठ, दिरडे, झुणका भाकरी, ठेचा, मिसळ पाव इ. मराठमोळ्या उपहारगृहात मिळणारे पदार्थ पूर्णब्रह्मच्या मेन्यू कार्डवर बघायला मिळतात. ग्राहकांना वेगवेगळ्या चवींची मेजवानी मिळावी म्हणून, दर दिवशी वेगळा प्रांत, वेगळे पदार्थ अशी वर्गवारी केली आह़े जसे की, सोमवारी-शिवथाली म्हणजे रायगड प्रांत. त्यादिवशी सगळे पांढरे पदार्थ. पांढराशुभ्र दहीभात, पोळ्या, दह्यात केलेली चटणी, पांढरे श्रीखंड, कोशिंबीर. रविवारी- महालक्ष्मी थाळी, कोल्हापुरची. त्यादिवशी पुरणपोळ्या, मोदक, पातळ भाजी, मसालेभात, कोहळ्याची भाजी असा मेनू असतो.

ह्या सर्व पदार्थांचा आस्वाद आपण महाराष्ट्रात राहून घेत आहोत, असा ग्राहकाला `फील’ यावा, ह्यादृष्टीने पूर्णब्रह्म उपाहारगृहात वातावरणनिर्मिती केली आहे. एकावेळी २०० जणांची पंगत बसू शकेल, अशी चौरंग-पाटाची भारतीय बैठक. भरसभेत आसनस्थ झालेले शिवाजी महाराज, पंढरपूरच्या दिशेने धाव घेणारे वारकरी, गणेशोत्सवात ढोल वादनात मशगुल झालेले वादक उपाहारगृहाच्या भिंतींवर चितारलेले दिसतात. मांडणीवर आकर्षक पद्धतीने रचलेली मराठी पुस्तकेही ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. पुणेरी पगडी, टाळ ह्या गोष्टीही जागोजागी छान रचून ठेवल्या आहेत. त्यात सर्वांच्या `जयंती वहिनीं’चा नऊवारी साडीतला सहज वावर एखाद्या कुटुंबात आल्याची जाणीव करून देतो.

कधी काळी आयटी क्षेत्रामुळे स्कर्ट, ट्राऊजर, शर्ट-पँटमध्ये वावरणाऱ्या जयंती ह्यांनी आपल्या व्यवसायाला साजेसा पेहराव स्वीकारून स्वत:मध्ये बदल घडवून आणला आहे. त्यांच्या पेहरावामुळे अमराठी लोकांनाही मराठी संस्कृतीबद्दल कुतूहल वाटू लागले आहे.
पाच महिन्याच्या बालकापासून ७५ वर्षांच्या आजोबांपर्यंतच्या वयोगटातले ग्राहक पूर्णब्रह्मचे चाहते आहेत. घरी पोटभर न जेवणारी मुले इथे चवीने जेवतात, ह्याचा त्यांच्या आयांना हेवा वाटतो. जेवणाची थाळी स्वच्छ करणाऱ्या बालकांचे फोटो फेसबुकवर झळकवले जातात, तसेच त्यांना शेतकऱ्याचा मित्र म्हणून गौरविले जाते. मुलांना अन्नाची किंमत कळावी, म्हणून अशा क्ऌप्त्या लढवल्या जातात. मोठ्या माणसांकडून अन्नाचा व्यय होऊ नये, म्हणून पूर्णब्रह्मचा नियम आहे, `सगळे जेवण संपवले, तर बिलावर ५ टक्के सवलत दिली जाईल आणि जेवण ताटात उरले, तर २ टक्के जास्त रक्कम भरावी लागेल!’

जयंती आयटीक्षेत्रात असल्याने त्यांच्या आदर्श म्हणजे इन्फोसिसच्या संस्थापिका सुधा मूर्ती! त्यांनी जयंती ह्यांच्या आग्रहाखातर पूर्णब्रह्मला भेट दिली. त्यांनाही हा उपक्रम आवडला. पुण्यात आणि बंगळुरू येथील इन्फोसिसमध्ये पूर्णब्रह्मच्या शाखा सुरू करण्यासही त्यांनी परवानगी दिली. मुंबईत अंधेरी येथेही पूर्णब्रह्मची शाखा सुरू झाली आहे. फिलाडेल्फिया आणि शिकागो येथे शाखा सुरू होण्याच्या मार्गावर आहे, तसेच मुंबई-दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरही शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून प्रवाशांना केवळ आठवणीच नाही, तर आपली संस्कृतीही सोबत नेता यावी.

जयंती ह्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमामुळे अनेक हातांना रोजगार, मोठे व्यासपीठ, कामाचे समाधान आणि आनंद मिळत आहे. `माझ्या निर्णयाला नवऱ्याचा , मुलांचा पाठिंबा आणि कुटुबियांचे, मित्रपरिवाराचे सहकार्य मिळाले, म्हणून इथवर मजल मारू शकले. प्रत्येक स्त्रीला अशा प्रकारे मदतीचा हात मिळाला, तर तीदेखील कुटुंबीयांची स्वप्ने पूर्ण करता करता स्वत:ची स्वप्ने पूर्ण करू शकेल’, असे जयंती कठाळे सांगतात.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]