राष्ट्रवादीला खिंडार… जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

10
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनाभवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

सामना प्रतिनिधी । मुंबई

मराठवाडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात पाच दशके दबदबा असलेले राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी शिवसेना भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या संपूर्ण परिवारासह शिवसेनेत प्रवेश करणाऱया जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. स्थापनेपासून जो पक्ष वाढवला त्याच पक्षात घुसमट, कुचंबणा होऊ लागल्याने संयमाची परिसीमा झाली. यामुळेच लहानपणापासूनच ज्या पक्षाचे आकर्षण होते त्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

बीड जिह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे ताकदीचे नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर हे चार वेळा आमदार राहिले आहेत. राष्ट्रवादीतील गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांचा त्यांनी जाहीररीत्या प्रचार केला होता. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. जयदत्त क्षीरसागर यांनी आज संपूर्ण परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, उपनेत्या नीलम गोऱहे, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते.

बीड जिह्यात शिवसेना मजबूत करा – उद्धव ठाकरे
शिवसेनेचा परिवार वाढतोय, विश्वासार्हता वाढत आहे. जयदत्त क्षीरसागर यांचा परिवार घरापुरता मर्यादित नाही तर त्यांचा परिवार हा महाराष्ट्रभरात पसरलेला आहे. आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिलात, पण आपली होणारी घुसमट व्यक्त केली. शिवसेनेविषयीच्या आकर्षणामुळे तुम्ही शिवसेनेत आला आहात. शिवसेनेवर दाखविलेला विश्वास कधीही अंध विश्वास ठरत नाही. त्यामुळे शिवसेना अधिक बलवान करण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकणार आहोत. बीड जिह्यात शिवसेना मजबूत करायची आहे. भविष्यात शिवसेनेसाठी जे चांगले स्वप्न बघितले आहे त्या स्वप्नात तुम्हाला नक्कीच सहभागी करून घेऊ, असे आश्वासन देत उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांचे शिवसेनेत स्वागत केले.

शिवबंधनाची वीण अतूट राखणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे शिवबंधन बांधले आहे त्याची वीण अतूट राहावी, मजबूत राहावी यासाठी प्रयत्न करीत राहीन. जातपात न मानता गुण, कामाला आणि निष्ठsला प्राधान्य दिले जाते त्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबद्दल लहानपणापासूनच आकर्षण होते. अखेर शिवसेनेत प्रवेश करण्याचा योग जुळून आला. केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रचार करणार असे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या