बीड जिल्ह्याने महिलेलाच लोकसभेचे प्रतिनिधीत्व दिले – जयदत्त क्षीरसागर


सामना प्रतिनिधी । बीड

स्व. काकूंच्या कार्यकाळापासून बीड जिल्ह्याने लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी महिलांनाच दिलेली आहे. डॉ. प्रितम मुंडे याच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्‍वास आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, विलास बडगे, दिनकर कदम आदि उपस्थित होते.

जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, लोकशाहीत आता नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत. गुणवत्ता, ज्ञान आणि मक्तेदारी हे कुणा एकाकडे राहिली नाही. बीड जिल्ह्याने लोकसभेचे प्रतिनिधीत्व महिलांच्या हातीच सोपवलेले आहे कारण लोकसभेचे प्रतिनिधीत्व अधिकाधिक महिलांनाच मिळाले आहे. आत्तापर्यंत लोकसभांच्या निवडणूकीत बीड जिल्ह्याने कधी जात पाहिली नाही मग आजच जात पाहून मतदान मागण्याचे कारण काय? ज्या गोष्टी या प्रक्रियेतच नाहीत त्या विनाकारण निवडणूक काळात उकरल्या जातात. पंतप्रधान मोदींबाबत अपप्रचार करून विनाकारण अफवा पसरवल्या जात आहेत. देश व राज्य आणि जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जावा यासाठीच आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बीडच्या न्यायालयाची ईमारत 95 कोटी रूपयांची आहे हे काम सातत्याने पुढाकार घेतल्यामुळेच झाले. वीकीलसंघासाठी ज्या सुविधांची गरज आहे त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील. आगामी काळात जात-पात धर्म न पाहता डॉ.प्रितम मुंडेंनाच मतदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.