… तर मुंबई खऱ्या अर्थाने ‘स्वच्छ’ होईल!

>>जयेश राणे<<

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर आंतरराष्ट्रीय पटलावर हिंदुस्थानातील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध देशांचे नागरिक येत असतात. कोणत्याही देशात पाऊल ठेवले असता सर्वप्रथम लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे स्वच्छता. शहरातील उच्चभ्रू वस्त्या आणि लोकप्रतिनिधी यांचा वावर असलेली ठिकाणे स्वच्छ असणे म्हणजे शहर स्वच्छ असणे नव्हे. स्वच्छता नागरी सुविधांपैकी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ती राखणे प्रशासन, सरकार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे कर्तव्य आहे. याविषयी प्रत्येकाने आपले दायित्व पार पाडल्यास मुंबई खऱ्या अर्थाने स्वच्छ राजधानी होण्यास विलंब लागणार नाही.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेच्या मूल्यांकनासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशातील ४ हजार २०३ शहरांचे ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात झारखंड राज्याला प्रथम पारितोषिक मिळाले तर महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर म्हणून इंदूरची (मध्य प्रदेश) निवड करण्यात आली आहे. तसेच देशातील स्वच्छ राजधानीचा मान मुंबईला मिळाला आहे. नावीन्यपूर्ण विभागात १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नागपूरला नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कार्यशैली यांचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. ३ लाख ते १० लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वात अधिक गतीने स्वच्छतेकडे वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये भिवंडी-निजामपूर शहरास प्रथम क्रमांक मिळाला तर छोटय़ा शहरामध्ये (एक ते तीन लाख लोकसंख्या) भुसावळ शहराने पारितोषिक पटकावले आहे. पश्चिम क्षेत्रातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमधील स्वच्छ शहराचा मान पाचगणीने तर नागरिक प्रतिसाद विभागातील सर्वोत्कृष्ट शहराचा मान अमरावती जिल्ह्य़ातील शेंदूरजनाघाट शहराने मिळविला आहे. उत्कृष्ट नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मान सासवडला मिळाला आहे.

मुंबई महानगराबद्दल बोलायचे तर विविध कारणांसाठी मुंबई शहराकडे परराज्यांतून येणाऱ्या लोंढय़ांचे प्रमाण खूप आहे. यावरून या शहराच्या स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रचंड भार पडतो. अस्वच्छतेविषयी मानवी सवयी आणि सरकार, प्रशासकीय दिरंगाई यांच्या तराजूत कोणाचे पारडे सर्वाधिक जड आहे याकडे प्रथम लक्षवेध होतो. त्यामुळे सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ निकालाच्या अनुषंगाने मुंबई महानगराचा कानोसा घेणे अत्यावश्यक आहे. निकाल ऐकल्यावर, वाचल्यावर मुंबईतील अनेक रहिवाशांना मुंबई स्वच्छ राजधानी कशी, असा प्रश्न पडला असेल. मर्यादित कालावधीसाठी केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईला स्वच्छ राजधानीचा मान मिळाला आहे. वास्तविक स्वच्छतेबाबत वार्षिक सर्वेक्षण झाले पाहिजे.

मुंबईतील स्त्राr वर्गासाठी प्रसाधनगृहांची (टॉयलेट) संख्या अत्यल्प आहे. याचा सर्वाधिक त्रास स्त्राr वर्गाला सोसावा लागतो. त्यासाठी काही स्त्रियांनी ‘राइट टू पी’ मोहीम राबवली होती, पण त्याचा सकारात्मक अद्याप परिणाम दिसला नाही. शाळा-महाविद्यालये-नोकरी-व्यवसाय यांसाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्राr वर्गाची संख्या ही पुरुषांच्या तुलनेत बऱ्यापैकी आहे. या क्षेत्रांतील स्त्राr वर्गाला प्रतिदिन सतावणाऱ्या या समस्येवर मार्ग निघण्याच्या अनुषंगाने सरकार आणि प्रशासन यांच्याकडून आजही सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. जी सार्वजनिक प्रसाधनगृह आहेत तेथील स्वच्छता हा कायम वादाचा विषय राहिला आहे. या ठिकाणी प्रवेशच करू नये असे वाटते. उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना सकाळच्या वेळी कित्येकजण प्रातविधी उरकण्यासाठी रेल्वे मार्गाचा उपयोग करताना दिसतात. त्यामुळे नैसर्गिक विधीची अडचण प्रामुख्याने सुटू शकलेली नाही. लोकसंख्येच्या तुलनेत प्रसाधनगृह असायलाच पाहिजे.

७५ लाखांहून अधिक प्रवासी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेचा नियमित उपयोग करतात. यावरून ही सेवा आणि यावर असलेला भार लक्षात येतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गांवरील रेल्वे गाड्यांची वाहतूक पावसाळ्यात सुरळीतपणे चालण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते; पण तरीही रेल्वे रुळांवर पाणी तुंबते आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. पसरलेला कचरा पावसाचे पाणी रेल्वे रुळांवरून बाहेर पडण्यास अडथळा निर्माण करतो. त्यामुळे कितीही स्वच्छता केली तरी त्याचा उपयोग होत नाही. याला कुठेही कचरा टाकणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा अस्वच्छपणा, तसेच रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपडपट्टय़ाही कारणीभूत आहेत. यामुळे जिथे फलाट (Platform) आहेत तिथे कचरा वेचणारा नियुक्त करावाच लागतो. अन्यथा रेल्वे रुळांना कचरा कुंड्यांचे स्वरूप आल्याविना राहणार नाही. रेल्वे रुळांवरून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग तयार करणे खडतर काम आहे. त्यासाठी पुरेसे मार्गही उपलब्ध नाहीत.

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील रहिवासी असो. सर्वांनीच लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे कचरा हा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. अनेकजण कचरा नाले-गटारे यांत टाकतात. त्यामुळे अस्वच्छता पसरते आणि रोगराईला पाळेमुळे घट्ट करण्यास आपल्यामुळेच आयती संधी मिळते. सर्वांनाच इमारतीमध्ये निवास करणे आर्थिकदृष्टया परवडणारे नसते. त्यामुळे जरी बैठय़ा खोल्यांत राहावे लागत असले तरी घराप्रमाणे परिसरही स्वच्छ ठेवणे सहजशक्य आहे. त्यासाठीच कचरा हा कचराकुंडीतच टाकला गेला पाहिजे. अस्वच्छता कमी झाली तर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होणार नाही. देशातील कोणत्याही शहर, गाव येथे काही कारणास्तव जावे लागल्यास त्या भागावर आपल्या प्रांताएवढेच प्रेम करता आले पाहिजे. आपण येथील रहिवासी नाही त्यामुळे कुठेही पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या मारल्या, वाटेल तिथे कचरा टाकला तरी काय हरकत आहे. असा विचारच अस्वच्छतेकडे घेऊन जातो आणि जिथे जातो तो भाग अस्वच्छ केला जातो. देशातील शहर, गाव स्वच्छतेत अव्वल स्थानी आणणे नागरिकांच्याही हातात आहे. त्यामुळे कचरा टाकताना कुठेही कचरा टाकला जात असेल तर तशी कृती होण्यापूर्वीच हात आखडता घेऊन त्यास नियोजित स्थानी टाकले पाहिजे.

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर आंतरराष्ट्रीय पटलावर हिंदुस्थानातील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विविध देशांचे नागरिक येत असतात. कोणत्याही देशात पाऊल ठेवले असता सर्वप्रथम लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे स्वच्छता. शहरातील उच्चभ्रू वस्त्या आणि लोकप्रतिनिधी यांचा वावर असलेली ठिकाणे स्वच्छ असणे म्हणजे शहर स्वच्छ असणे नव्हे. स्वच्छता नागरी सुविधांपैकी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ती राखणे प्रशासन, सरकार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे कर्तव्य आहे. याविषयी प्रत्येकाने आपले दायित्व पार पाडल्यास मुंबई खऱ्या अर्थाने ‘स्वच्छ राजधानी’ होण्यास विलंब लागणार नाही.