लेख : ‘सायबर आक्रमण’ थांबविणार कसे?


>>जयेश राणे<<

रणभूमीवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी सैनिकांच्या तुकडय़ा सज्ज असतात. शत्रू आक्रमण करत असताना त्यांचा नेटाने प्रतिकार करणे, अहोरात्र सुरक्षा कवच सज्ज ठेवणे या गोष्टी सैनिक प्रत्यक्षपणे करत असतात. त्याचप्रमाणे सायबर आक्रमणकर्त्यांना धूळ चारण्यासाठी देशाला मोठय़ा प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सायबर आक्रमणे कशी रोखायची, हा एक गंभीर प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावू शकते.

दहशतवादी आणि नक्षली हल्ले आपल्याला नेहमीचेच आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या हल्ल्यांच्या रांगेत ‘सायबर हल्ला’ येऊन बसला आहे. सायबर चाचे विरुद्ध सायबर सुरक्षा हा संघर्ष सतत चालू आहे. सायबर सुरक्षा कवच भेदून गोपनीय माहिती मिळवणे, आर्थिक लूट करणे याच उद्देशाने सायबर चाचे कार्यरत असतात. त्यांनी सायबर सुरक्षा कवच भेदू नये यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा कस लागत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपला देश प्रगती करत आहे, हे खरेच. पण ती करताना पुढचं पाठ आणि मागचं सपाट, तेलही गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे असे घडत असल्याची प्रचीती येत आहे.

पुणे येथील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात असलेल्या सर्व्हरवर सायबर चाच्याने ‘हल्ला’ केला. या बँकेवर सायबर हल्ला झाल्याने बँक, खातेदार चिंतेत असणे साहाजिकच आहे. देशातील हा सर्वात मोठा सायबर हल्ला आहे. आंतरराष्ट्रीय हॅकर्सनी या बँकेस 94 कोटी 42 लाख रुपयांचा गंडा घातला. प्रतिदिन सायबर हल्ले वाढत आहेत. पण त्यांना परतवून लावण्यासाठी सक्षम यंत्रणा सिद्ध करणे संबंधित व्यवस्थेची जबाबदारी आहे. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यातून हॅकर्सनी नेमकी काय माहिती मिळवली याचा तपशील मिळवणे आव्हानच असणार आहे. सायबर चाच्यांनी मिळवलेल्या माहितीचा दुरुपयोग ते कधी आणि कसा करतील याचा नेम नाही. त्यासाठीच सायबर सुरक्षा कवच भक्कम असणे अनिवार्य आहे. किंबहुना ती काळाची गरज आहे. बँक खातेदारांना हल्ला कसा झाला यामागील तांत्रिक कारणे, त्रुटी यांच्याशी संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही. आपले खाते असलेल्या बँकेतील रकमेची लूट झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या मनात शंकाकुशकांचे काहूर माजणे, स्वाभाविक आहे. हिंदुस्थानात होणाऱ्या बहुतांश सायबर हल्ल्यांचे केंद्र दुसऱ्या देशांत असते. त्यांची ठिकाणे बदलत असतात. म्हणजेच हिंदुस्थानातील सायबर सुरक्षेतील त्रुटींचा ऑनलाइन लूट करणाऱ्या दरोडेखोरांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे. आपल्या देशामध्ये पुढच्यास ठेच मागचा शहाणा याप्रमाणे शिकण्याची, सावध होण्याची वृत्ती अत्यल्प आढळते. म्हणूनच या सायबर लुटारूंचे फावते आहे.

आज एक बँक मोठय़ा हल्ल्याची बळी ठरली आहे. उद्या तीच गोष्ट दुसऱ्या बँकेच्या संदर्भात होऊन पुढील धावपळ (पोलीस तपास, लूट झालेली रक्कम परत मिळण्याची चिंता) करावी लागू नये, याकडे लक्ष द्यायला हवे. सायबर चाच्यांकडून धडा मिळाल्यावर अधिक सतर्कता बाळगण्याची मोठी जबाबदारी संबंधित व्यवस्थेची असते. कोणताही शत्रू एकदा आक्रमण करून थांबत नाही, तर तो विविध योजना आखून पुनः पुन्हा चाल करून येतच असतो. एटीएम, ऑनलाइन व्यवहारांची पडताळणी प्रतिदिन बारकाईने होणे महत्त्वाचे आहे. देशातील विविध बँकांना सायबर चाच्यांनी दणका दिलेला आहे. कोणत्या बँकेला कोणत्या स्वरूपाचा तंत्रज्ञानसदृश फटका बसला आहे, याची माहिती बँकांनी एकमेकांना दिली (शेअर करणे) पाहिजे. माहितीची ही देवाणघेवाण होणे महत्त्वाचे आहे. यातूनच सर्वांना सतर्कता बाळगण्यास सहाय्यच होणार आहे. सतर्कतेच्या दृष्टीने एकमेकांना सहाय्य करण्यातच बँकिंग क्षेत्राचे हित आहे .

विजय मल्ल्या, नीरव मोदी या ‘दरोडेखोरां’नी बँकांची लूट करून संबंधित बँकांना फसवले आणि देशाबाहेर पलायन केले. या प्रकरणांत व्यक्ती समोर होत्या, त्यांनी दिलेली (खोटी)कागदपत्रे बँकांकडे होती. मात्र कर्ज फेडण्यासाठी होत असलेली टाळाटाळ आणि कर्जाचा बोजा बँकांच्याच माथ्यावर ठेवून त्यांनी पळ काढला. त्यामुळे कर्जफेडीसाठी त्यांना हिंदुस्थानात परत आणण्यासाठी खटाटोप सुरू आहे. तो किती यशस्वी ठरेल हे येणारा काळच सांगेल. मात्र बँकिंग क्षेत्राला सायबर चाचे आणि मल्ल्या आणि मोदी यांच्यासारखे ठग यांच्यापासून स्पष्ट धोका आहे. दोन्ही प्रकारचे दरोडेखोर बँकांची लूट करण्यासाठी टपलेले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्राने कायम सतर्क असणे निकडीचे आहे. या क्षेत्रात होणारी प्रत्येक उलाढाल पैशांशी संबंधित असते. त्यामुळे स्वतःच्या लाभासाठी आपला कोण उपयोग करून घेत आहे का? सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने अद्ययावत राहिले जात आहे का? यावर बँकांनी लक्ष ठेवून लबाडांचे पितळ उघडे पाडले पाहिजे.

देश एकीकडे डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. देशभरात सॉफ्टवेअर इंजिनीयर्स मोठय़ा संख्येने बाहेर पडत आहेत. हे मनुष्यबळ सायबर हल्ले रोखण्याच्या कामी कसे वापरता येईल  याचा अभ्यास केंद्र सरकार आणि विद्यापीठे यांनी केला पाहिजे. मात्र त्यात चालढकलपणा, गांभीर्याचा अभाव या गोष्टी होऊ नयेत. अर्थात एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे अकुशल विद्यार्थ्यांची फौज पूर्वीप्रमाणेच बाहेर पडत राहणे हीदेखील चिंताजनक गोष्ट आहे.

रणभूमीवर प्रत्यक्ष युद्धात शत्रूशी दोन हात करण्यासाठी सैनिकांच्या तुकडय़ा सज्ज असतात. शत्रू आक्रमण करत असताना त्यांचा नेटाने प्रतिकार करणे, अहोरात्र सुरक्षा कवच सज्ज ठेवणे या गोष्टी सैनिक प्रत्यक्षपणे करत असतात. त्याचप्रमाणे सायबर आक्रमणकर्त्यांना धूळ चारण्यासाठी देशाला मोठय़ा प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सायबर आक्रमणे कशी रोखायची, हा एक गंभीर प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान मोलाची भूमिका बजावू शकते.