‘तो’ मदतीची भीक मागत होता; लोकं सेल्फी, व्हिडीओ काढत होते

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानच्या बाडमेर चौहटन भागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे शाळेची बस आणि दुचाकीस्वार यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्याला मदत करण्याचे सोडून लोकं त्याच्यासोबत सेल्फी, व्हिडीओ काढत होते. अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. उपस्थित लोकांनी सेल्फी किंवा व्हिडीओ काढण्याऐवजी अपघातातील जखमींना मदत केली असती तर दोघांचा जीव वाचला असता. परंतु माणुसकी हरवलेल्या या तांत्रिक युगामध्ये लोकांनी त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी सेल्फी आणि व्हिडीओ काढण्यात धन्यता मानली.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बाडमेर चौहटन भागात शाळेची बस आणि दुचाकीस्वार यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातामध्ये जखमी झालेला एक तरूण तडफडत मदतीसाठी भीक मागत होता. परंतू त्याला मदत करण्याऐवजी लोकं कोडग्यासारखे हा सर्व प्रकार पाहात बसले होते. यात कहर म्हणजे एकाने तर चक्क त्या घटनेचा व्हिडीओ बनवत सेल्फी घेतली. वेळीच मदत न मिळाल्याने जखमी व्यक्तीने तडफडत जीव सोडला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने सुरक्षेची हमी दिली असतानाही त्यांच्यासोबत लोकं सेल्फी आणि व्हिडीओ काढण्यान मग्न असतात. हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. यापूर्वी २०१७ मध्ये लखनऊच्या किंग जॉर्ज हॅास्पिटलमध्ये तीन महिला कॉन्स्टेबलने बलात्कार पीडितेसोबत सेल्फी काढला होता. हा फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर तिन्ही कॉन्स्टेबलला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.