ब्लॉग : ती एक अविस्मरणीय भेट!

जे. डी. पराडकर । देवरूख

राजकारणात उच्च पदावर असणाऱ्या नेते मंडळींना भेटण्याची तशी सर्वांचीच ईच्छा असते. त्यात राजकारणी स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक असेल तर, अशा नेत्याविषयी मनात असणारे भाव हे नतमस्तक व्हावे असेच असतात. हिंदूस्थानात अनेक नररत्ने जन्मली. यातील काही मोजकीच राजकारणात आली. राजकारण हे केवळ चांगुलपणावर आणि विश्वासावर चालत नाही, यामुळे देशातील अनेक नररत्ने राजकीय पटलापासून दूर राहिली. मात्र जनसंघाच्या मूशीतून घडलेले अटलबिहारी वाजपेयी हे देशातील एक असामान्य आणि राजकारणात असूनही अखेरपर्यंत सर्वांनाच वंदनीय वाटलेलं व्यक्तीमत्व. मी अटलजींवर लिहावे एवढी माझी पात्रता नाही असं मी समजतो. तरीही 1999 साली पंतप्रधान निवासस्थानी त्यांच्या सोबत झालेली आमची दीड तासांची एक अविस्मरणीय भेट आज पुन्हा एकदा आठवली आणि नकळत त्या भेटीच्या क्षणी जसा नतमस्तक झालो, तसाच आज त्यांच्या आपल्यात नसण्याच्या वृत्ता नंतर आपोआप झुकलो आणि निशब्द बनलो.

दिल्लीत जायची ईच्छा प्रत्येक व्यक्तीची असते. आम्हालाही असं वाटायचे दिल्लीला जावे, पण ते त्यावेळचे पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीसाठी दिल्ली, आग्रा या भागात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत तेथील कुतूबमिनारच्या उंची विषयी कलापुस्तकात वाचलेही होते. मात्र मला दिल्लीची उत्सुकता होती ती कुतूबमिनारपेक्षा, राजकारणात ज्यांनी स्वतःच्या स्वच्छ चारित्र्याने आणि कमालीच्या प्रतिभेने मोठी उंची गाठलेल्या अटलजींची. पंतप्रधान असलेल्या अटलजींची भेट मिळणं हे तसं सोप नव्हते. यासाठी एक जवळची आणि तेवढीच विश्वासाची व्यक्ती मध्ये असणं महत्वाचे होते. राजकारणातील असंच एक नम्र आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तीमत्व म्हणजे सुरेश प्रभू! खासदार म्हणून कदाचित त्यांचा आपल्या मतदारसंघात संपर्क कमी असेलही पण या अफाट हुशारी असणाऱ्या व्यक्तीमत्वाची देशाला असणारी गरज त्याहून अधिक मोलाची. सुरेश प्रभूंजवळ व्यक्तीश: ओळख असल्याने एकदा कोकणातील बांबू लागवडीच्या किफायतशीर प्रयोगाबाबत त्यांची मुलाखत घेत असतांना दिल्ली भेटीची आणि त्यातही अटलजींच्या भेटीबाबतची उत्सुकता बोलून दाखवली होती.

सुरेश प्रभू त्यावेळी केंद्रीय उर्जामंत्री होते. त्यांचा दिनक्रम सतत व्यस्त. अशा व्यस्त कारभारातून आम्ही व्यक्त केलेली अपेक्षा त्यांच्या लक्षात असेल असं वाटत नव्हते. मात्र एक दिवस त्यांचा पुतण्या योगेश प्रभू याचा मला फोन आला आणि त्याने प्रभू साहेबांनी पत्रकार आणि राजकीय पदाधिकारी यांच्या दिल्ली दौऱ्याचे आयोजन केल्याची आनंदाची वार्ता दिली. या दौऱ्यात पंतप्रधान अटलजींची भेट नक्की होणार असं साहेबांनी सांगितले आहे, हे सांगायला योगेश विसरला नाही. त्यावेळी झालेला आनंद खरंच अवर्णनीय होता. आम्ही दिल्ली दौऱ्याच्या तयारीला लागलो आणि एक एक दिवस मोजत होतो. आम्ही दिल्ली दौऱ्यावर निघण्यासाठी केवळ सहा दिवस राहीले आणि संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. संसदभवन परिसरात जे घडले ते निंदनीय होते. देशभरात सर्वत्र अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला. झालं आमची खात्री पटली की, आता आमचा दिल्ली दौरा रद्द होणार आणि अटलजींना भेटण्याचे स्वप्न आता स्वप्नच राहणार. संसद हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी परत योगेश प्रभू यांचा फोन आला साहेबांचा फोन आला होता आणि आपला दिल्ली दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे.

अखेर दिल्ली प्रवास सुरु होवून आम्ही राजधानीत पोहचलोच! दिल्लीला पहिल्यांदाच आल्याने ईतिहास डोळ्यापुढे उभा राहिला सुरेश प्रभूंची आणि आम्हा सर्वांची भेट झाली. त्यांनी सर्वांची कुटूंबातील सदस्यांप्रमाणे विचारपूस केली. त्यावेळीही मी हळूच त्यांच्या जवळ जावून अटलजींच्या भेटीविषयी आग्रह धरला. उत्तरादाखल प्रभू साहेब मिश्किल हसले होते. दुसऱ्या दिवसापासून आम्ही अडवाणीजींना, व्यंकय्याजींना, अमरसिंहजींना, मनोहरजी जोशींना अशा एक ना अनेक दिग्गज मंडळींना सुरेश प्रभू साहेबांसोबत अगदी सहज भेटलो होतो. या प्रत्येक भेटीत प्रभूसाहेबांचे दिल्लीतील स्थान पाहून ऊर अभिमानाने भरुन येत होता. दिग्गज नेत्यांच्या भेटीत आम्ही स्व. जयवंतीबेन मेहता यांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्यांनी प्रभू साहेबांना विचारले की, आज संध्याकाळी कोणाची भेट घेणार? त्यावर प्रभू साहेब सहज बोलून गेले की, पंतप्रधान अटलजींची भेट ठरली आहे. त्यावर जयवंतीबेन आश्चर्यचकीत होवून विचारले, आपल्याला अटलजींची भेट मिळाली आहे? त्यावर प्रभू साहेबांनी ‘हो’ असे उत्तर दिल्यानंतर जयवंतीबेन म्हणाल्या, अहो माझ्या मतदारसंघातील पाच व्यक्तींना काल सुरक्षिततेच्या कारणास्तव भेट नाकारली आणि आपल्या एवढ्या मोठ्या ताफ्याला परवानगी मिळालीच कशी? आमचा ताफा थोडाथोडका नव्हे तर, ६५ जणांचा होता आणि जयवंतीबेन सत्ताधारी भाजपाच्या आणि सुरेश प्रभू शिवसेनेचे खासदार होते. यातूनही खूप काही कळून येते.

आम्ही पंतप्रधान निवासस्थानाबाहेर येवून पोहचलो. आम्हाला विश्वासच बसेना की, काही वेळात आम्ही अटलजींना भेटणार आहोत. सुरेक्षेबाबतच्या सर्व त्या सूचना आम्हाला देण्यात आल्या. जवळपास सहा सुरक्षा यंत्रणा भेदतांना दोन्ही बाजूंची खूप दमछाक झाली. एवढ्या संख्येने आम्ही आल्याबद्दल सुरक्षायंत्रणाही नाराज होती. त्यांच्या तोंडून जे उद्गार आले ते ऐकून अभिमान वाटला. सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे होते प्रभूसाहेबांसमोर कोणाचेच काही चालत नाही. आम्ही पंतप्रधान निवासस्थानी पोहचलो . सर्व स्थानापन्न झाले तरी, प्रभू साहेबांचा पत्ता नाही. पाच मिनीटात वर्दी आली अटलजी येत आहेत. तरीही प्रभू साहेब आलेले नाहीत. आम्ही थोडे चिंताग्रस्त झालो. अखेर पंतप्रधान अटलजी आले आम्ही सर्वांनी उभे राहून त्यांचा नमस्कार केला. अटलजी स्थानापन्न झाले. त्यांनी शब्दसुमनाने खास त्यांच्या शैलीत सर्वांचे स्वागत केले. ओघवती भाषा, शांत आणि मितभाषी स्वभाव, प्रसन्न व्यक्तीमत्व अशा असंख्य गुणांचा मिलाफ असलेल्या अटलजींना आम्ही प्रत्यक्ष पाहून कमालीचे भावूक होवून मनोमन सुखावलो होतो.

प्रभूजी येइपर्यंत आपण सर्वांनी आपले नांव आणि कोणत्या तालुक्यातून आलात हे सांगा असे अटलजींनी सांगताच आम्ही तर चकीत झालो. उपस्थित ६५ जणांनी आपले नांव, व्यवसाय, पद आणि जिल्हा सांगितला. सर्वांची ओळख सांगून झाली आणि प्रभू साहेब अक्षरशः धावत धावत आतमध्ये आले. त्यांना आलेले पाहून मिश्किलपणाने अटलजी म्हणाले, पंतप्रधान येवून बसले तरी, उर्जा मंत्र्यांचा पत्ता नाही. याचा अर्थ केवळ असा आहे की, आपले खासदार आणि देशाचे उर्जामंत्री दिल्लीमध्ये कामात किती व्यस्त असतात, हे आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून मतदारसंघात जावून आवर्जून सांगा. प्रभूंसाठी यापेक्षा शाब्बासकीची मोठी थाप कोणती असेल?

जवळपास दीडतास आम्ही अटलजींच्या समवेत पंतप्रधान निवासस्थानी होतो. निष्कलंक व्यक्तीमत्वाचा सहवास एवढ्या कालावधी करीता मिळावा हे आमचे भाग्यच. आम्हाला अटलजींसमवेत फोटो हवा होता. हा फोटो म्हणजे आमच्यासाठी खूप दुर्मीळ ठेवा ठरणार होता. अटलजींसमवेत अगदी जवळून फोटोही मिळाला त्यावेळी या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या पायाला स्पर्श करण्याचं भाग्यही लाभले. त्याक्षणी मला कुतूबमिनारची उंची देखील खूप खुजी वाटली . गेले अनेक दिवस अटलजी आजारी होते. अखेरीस आज तो दिवस आलाच. सायंकाळी जेंव्हा हे वृत्त कळले, त्याचवेळी 20 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली त्यांच्या चरणांना स्पर्श केला होता. आज परत एकदा नेत्रकडा पाणावल्या मात्र आज त्याला दु:खाची किनार होती. हिंदूस्थानातील राजकारणाची खूप मोठी हानी झाली. अशा पोकळ्या यापुढे भरुन निघणं कठीणच नव्हे तर, अशक्यच म्हणावे लागेल. अटजींवर असणारे संघाचे संस्कार त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत होते. संघाची शिकवण काय आणि कशी असते त्याचे अटलजी हे सर्वोत्तम उदाहरण होते. आम्हाला त्यांना पदस्पर्श करता आला, तो केवळ सुरेशजी प्रभूंमुळेच. व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांमुळे ती पुढे जातच राहते, आज प्रभूसाहेब भाजपामध्ये आहेत आणि त्यांचे दिल्लीतील स्थान अटलजींसारख्या नेत्यांनी त्यांना पारखल्याने आजही कायम आहे.