मला या पिझ्झापासून वाचवा…जर्मन वकिलाची साद

सामना ऑनलाईन। बर्लिन

पिझ्झा आवडत नाही असा शोधूनही कोणी सापडणार नाही. पण हाच पिझ्झा जर्मनीतील एका वकीलासाठी डोकेदुखी ठरला आहे. गीडो ग्रोले असे या वकीलाचे नाव आहे. गेल्या २० दिवसात एका अज्ञाताने ग्रोले यांच्या घरी तब्बल १०० पिझ्झा पाठवले आहेत. गंमत म्हणजे अद्यापही त्यांच्या घरी पिझ्झा येत असल्याने त्यांच्या घराबाहेर पिझ्झा डिलीवरी बॉईजच्या रांगा लागल्या आहेत. एका पाठोपाठ एक अशा प्रकारे हे पिझ्झा त्यांच्या घरी येत असल्याने ग्रोले हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे एवढे पिझ्झा पाठवणाऱ्याचा अजूनही अतापत्ता लागत नसल्याने त्यांची व त्यांच्या कुटुंबाची झोपच उडाली आहे. यामुळे वैतागलेल्या ग्रोले यांनी मदतीसाठी पोलिसात धाव घेतली आहे.

२० दिवसात १०० पिझ्झा एकाच व्यक्तीच्या नावावर मागवण्यात आल्याने पिझ्झा कंपनी मात्र भलतीच खुश आहे. त्यातच या पिझ्झाचे पैसेही ही अज्ञात व्यक्ती ऑनलाईन भरत असल्याने कंपनीचा गल्ला भरत आहे. दरम्यान यामागे ग्रोले यांच्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याचा किंवा त्यांच्या एखाद्या शत्रुचा हात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. एखाद्याला त्रास देण्याची ही विक्षिप्त पध्दत बघून पोलीसही चक्रावले आहेत. दरम्यान यापुढे कधीही पिझ्झा्याकडे ढुंकुनही बघणार नाही असे ग्रोले यांनी सांगितले आहे.