जेटचे गोयल देखील मल्ल्यासारखेच उडणार होते

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल हे विजय मल्ल्याप्रमाणेच उडणार होते, अशी माहिती समोर आली आहे. पत्नी अनितासह नरेश गोयल ईके 507 विमानाने लंडनला जात होते. जर हे विमान थांबवले नसते तर तीन तासांच्या आता गोयल दुबईला पोचले असते. दुबई एअरपोर्टवर उभ्या असलेल्या लिमोजिन कारमध्ये बसून ते दुबई मरिना येथील आपल्या पेंटहाऊसमध्ये पोचले असते, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीला गृहमंत्रालयाच्या लूक आऊट नोटिसीमुळे देशाबाहेर जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. गोयल दाम्पत्य मुंबई विमानतळावर आलेले असताना त्यांना शनिवारी इमिग्रेशन अधिकाऱयांकडून अडवण्यात आले. अनिता गोयल यांच्या नावे असलेल्या बॅगाही विमानातून बाहेर काढून घेण्यात आल्या. या सगळय़ा प्रकारामुळे विमानाच्या उड्डाणालाही विलंब झाला. गृहमंत्रालयाला मिळालेल्या माहितीनुसार, गोयल लंडनला जाणार होते. दुबईला जाऊन ते दुसरे विमान पकडणार होते. शनिवारच्या संपूर्ण घडामोडींवर गोयल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र गोयल एतिहाद विमान कंपनी आणि हिंदुजा समूहासोबत होणाऱया आगामी बैठकीसाठी परदेशात जात होते, असे सांगितले जात आहे. 17 एप्रिलपासून जेटची सेवा बंद आहे. गेल्या आठवडय़ात हिंदुजा समूहाने जेट एअरवेजमध्ये गुंतवणुकीच्या संधीची चाचपणी करीत असल्याचे जाहीर केलेले आहे.

– काही दिवसांपूर्वीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेटची सेवा बंद करण्यात आली आहे. जेटचे 20 हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यानंतर गोयल यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी जेटच्या अधिकाऱयांनी आणि कामगार संघटनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. अशातच शनिवारी गोयल यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याने विजय मल्ल्याप्रमाणे गोयल हेदेखील पलायन करणार होते, अशी चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या