चांदण्यांचे दागिने

524

>>  ज्योत्स्ना गाडगीळ  

दागिने हा समस्त महिला वर्गाचा विक पॉइंट! मग ते दागिने सोन्याचे असो, हिर्‍याचे असो किंवा अगदी खोटे असो, नाहीतर हलव्याचे असो! मकरसंक्रांतीला मान असतो हलव्याच्या दागिन्यांना! कालपर्यंत हे दागिने हौसेखातर घरोघरी केले जात होते, आता त्याच दागिन्यांना व्यावसायिक स्वरूप आले आहे. सांगत आहे, हलव्याचे दागिने घडविणार्‍या आरती गोगटे.  

वर्षारंभीचा  पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत! विशेषतः नववधू-वर, तान्हे बाळ, पाच वर्षांखालील मुले-मुली यांच्या दृष्टीने या सणाचे महत्त्व जरा जास्तच असते. तिळ-गुळाचा गोडवा त्यांच्या आयुष्यात उतरावा आणि पांढर्‍या शुभ्र हलव्याच्या दागिन्यांनी त्यांचे रूप खुलावे, म्हणून आपल्या हौशी पूर्वजांनी हलव्याच्या दागिन्यांची परंपरा सुरू केली. आजतागायत त्या परंपरेत खंड पडला नाही. कारण ते दागिने घडवणार्‍या कलाकुसर मंडळींची आणि दागिने घालून मिरवणार्‍या हौशी मंडळींची कमतरता नाही.

नथ, अंगठी, वाकी, तोडे, बाजूबंद, कंबरपट्टा, मेखला, मंगळसूत्र,  ठुशी, हार, झुमके, हलव्याचे कान, वेल, पैंजण, चंद्रकोर या पारंपरिक दागिन्यांबरोबरच क्लच, हेअर ब्रोच, फॅन्सी नेकलेस, हेअर क्लीप, ब्रेसलेट हे दागिने नववधूसाठी! तर लहान मुलींसाठी राधा सेट, प्रिन्सेस सेट ज्यात समावेश असतो, टियारा, फॅन्सी बेल्ट, पैंजण, नेकलेस, बांगड्यांचा! पूर्वी मुलांसाठी मोरपिसाचा मुकुट असलेला कान्हा सेट तयार केला जात असे.  मात्र त्याचाही आता मेकओव्हर झाला आहे. फॅन्सी मुकुट, शाही हार, ब्रेसलेट आणि हलवा कोटेड बासरी असे त्याचे स्वरूप असते. जावयालाही साजेसा दोनपदरी हार, ब्रेसलेट, घड्याळ, अंगठी, मोबाईल, फुलांची परडी, श्रीफळ दिले जाते.

हलव्याच्या दागिन्यांचे बदलते स्वरूप नव्या पिढीच्याही हमखास पसंतीस पडते. मात्र एवढी व्हरायटी देण्यासाठी कारागीरांना चार महिने आधी दागिन्यांची पूर्वतयारी करावी लागते. आरती सांगते, ‘दसरा झाला, की संक्रांतीच्या दागिन्यांचे वेध लागतात. हा सिझनल बिझनेस असला तरी पूर्वतयारीत खूप वेळ जातो. हवामानातील आर्द्रता कमी झाल्यावर दागिन्यांसाठी लागणारा हलवा तयार केला जातो. तर रेडिमेड हलवा डिसेंबर दरम्यान बाजारात येतो. अवघ्या दहा-पंधरा दिवसांत दागिन्यांची घडणावळ करावी लागते. दागिन्यांची रचना करण्यात वेळ वाया जाऊ नये, म्हणून दागिन्यांचे नक्षीकाम, साचे करून ठेवले जातात. रंगीत कागद, जर, टिकल्या, लेस, ग्लिटर अशा सजावटीच्या अन्य वस्तूंची जमवाजमव केलेली असेल, तर आयत्या वेळेस गोंधळ होत नाही. बाजारात हलवा आला, की दिवस-रात्र मेहेनत घेऊन हे दागिने घडवले जातात. ते नीट वाळले नाहीत, तर हलवा निघून दागिन्यांची शोभा जाऊ शकते. म्हणून ते अतिशय हलक्या हातांनी हाताळावे लागतात. शुभ्र हलवा काळवंडू नये, याचीही बारकाईने काळजी घ्यावी लागते. अनेकांना हे दागिने एवढे आवडतात, की ते कायमस्वरूपी वापरता येणार नाहीत का? अशी विचारणा होते. मात्र, हलवा थंडीत शुष्क राहू शकतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात तो विरघळून जातो. म्हणून या दागिन्यांची शोभा संक्रांतीच्या काळातच! दागिने वापरून झाल्यावर कागदात, प्लॅस्टीकच्या पिशवीतून कपाटात सुरक्षित ठेवले, तर पुढल्या वर्षीही वापरता येतात किंवा कोणाला भेट देता येतात. दागिने घडवण्यात लागणारे श्रम पाहता त्यानुसार पैसे आकारले जातात. काही जण सवयीप्रमाणे दागिन्यांचा भाव करतात, तर काही जण आगाऊ रक्कम देऊन दागिने विकत घेतात. लोकांचा उत्साह पाहता कलाकुसर करणार्‍यालाही आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळते.’

आपली प्रतिक्रिया द्या