झारखंडच्या तरुणांनी लोकांच्या पैशांवर उभारली गडगंज प्रॉपर्टी

सामना ऑनलाईन । मुंबई

झारखंड राज्यातील जामतारा हा आदिवासीबहुल जिल्हा. गरिबी तेथील लोकांच्या पाचवीला पुजलेली. परिणामी शिक्षण आणि कामधंद्याच्या नावाने बोंब. अशी वस्तुस्थिती असली तरी ऑनलाइन फसवणुकीच्या गुह्यामुळे या जिल्ह्याचे रूपडेच पालटले आहे. साधा रस्ताही नसलेल्या गावात तेथील लोकांनी गडगंज प्रॉपर्टी उभी केली आहे.

बँकेतून बोलत असून तुमच्या डेबिट, क्रेडिट कार्डची मुदत संपत आली आहे. कार्ड चालू ठेवण्यासाठी डिटेल द्या अशी बतावणी करून नागरिकांना फसविण्याचे  काम जामतारा येथील तरुण करायचे. ते तरूण नागरिकांना कसे फसवायचे त्याचे एकमेकांना प्रशिक्षण देतात, म्हणूनच ते तरुण ऑनलाइन बँक फ्रॉडमध्ये अव्वल असल्याचे कफ परेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांनी झारखंडच्या बऱ्याच तरुणांना ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली आहे. दोन ते तीन महिने झारखंडमध्ये तपास केल्यानंतर तेथील तरुणांनी उभारलेल्या वैभवाची त्यांनी माहिती दिली. सकाळी 10 वाजता तरुण दोन मोबाईल घेऊन जंगलात जातात मग झाडावर बसून लोकांना फोनाफोनी करतात. संध्याकाळी 6 वाजता मोबाईल बंद करून ते घरी जातात. दिवसभरात कोण ना कोण त्यांच्या गळाला लागतोच असे कर्मंतांड येथील एका अधिकाऱ्याने सांगितले.

  • ज्याला जास्त पैसे मिळतील तो सर्व गावाचे केबलचे पैसे भरतो.  यामुळे पोलीस पकडायला आले की, सर्व गाव त्याच्या बाजूने उभे राहते.
  • आधी दिवसाला केवळ 150 कॉल त्या ठिकाणी रिसिव्ह व्हायचे, पण या भामटय़ांमुळे आता दिवसाला 10 ते 12 हजार कॉल तेथे रिसिव्ह होऊ लागलेत.
  • यामुळे जामताऱ्यात मोबाईल टॉवर्सची संख्या कमालीची वाढली आहे. विविध बँकानीदेखील त्यांच्या शाखा तेथे उघडल्या आहेत.
  • दुचाकी, चारचाकी गाडय़ांच्या शोरूमची संख्यासुद्धा वाढली आहे.

दारात रस्ता नाही, पण टुमदार बंगले

जामतारा जिह्यातील कर्मतांड, नारायणपूर, सहरपूर, बेना, जहूदी या गावातील तरुण बँकेच्या नावाने कॉल करून नागरिकांना चुना लावण्यात एक्सपर्ट आहेत. या गावात साधा रस्ता नीट नाही, पण तेथील लोकांनी टुमदार बंगले बांधले आहेत. दारात एसयूव्ही सारख्या महागडय़ा गाडय़ा उभ्या आहेत. घरांना ऍटोमॅटिक रिमोटचे दरवाजे केलेत. महागडय़ा दुचाकी घेतल्यात. ई वॉलेटचा वापर करून ऑनलाईन शॉपिंग करतात.

इंग्रजी आणि संभाषण कौशल्यासाठी क्लासेस

लोकांवर इम्प्रेशन पडावे, त्यांचा आपल्या बोलण्यावर विश्वास बसावा यासाठी जामतारामधील तरुण इंग्रजी शिकण्याबरोबर संभाषण कौशल्य वाढवण्यावर भर देत आहेत. हे हेरून तेथे गावागावात इंग्रजी आणि संभाषण कौशल्याचे क्लासेस खोलण्यात आले आहेत. मोठय़ा संख्येने तरुण तेथे शिकण्यासाठी जात असल्याचे तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले.