जनआंदोलनातून नवपेशवाई संपेल!

सामना प्रतिनिधी । पुणे

देशातील क्रांतीचा एल्गार आता विधिमंडळ किंवा संसदेतून न होता थेट रस्त्यावरील जनआंदोलनातूनच होणार आहे. या क्रांतीची प्रेरणा आम्ही भीमा-कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईतून घेतली असून हीच क्रांती नवपेशकाई संपवून टाकेल, असे प्रतिपादन गुजरातमधील दलित नेते आणि नवानिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केले.

पुण्यातील शनिकारकाड्य़ासमोर आयोजित ‘एल्गार परिषदे’त मेवाणी बोलत होते. रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, छत्तीसगडमधील मानवाधिकार कार्यकर्त्या सोनी सोरी आणि युवा नेता उमर खालीद यावेळी उपस्थित होते. मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि हिंदुत्वाच्या राजकारणावर जोरदार टीका केली.

२०१९ ला मोदींना घरी बसवू!
लोकशाही आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आम्ही गुजरातमध्ये दीडशे जागांकरून ९९ जागांवर आणून ठेवले आहे. आगामी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानच्या निवडणुकांसह २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात सर्व विरोधक मतभेद विसरून एकत्र आल्यास मोदींना घरी बसवू, असा विश्वास मेवाणी यांनी व्यक्त केला.

तुम्ही तर बच्चे आहात!
तीन-चार दिवसांपासून एल्गार परिषदेला होणाऱ्या विरोधाबद्दल मी व उमर खालीद ऐकत होतो. जिग्नेशला पुण्यात येऊ देणार नाही, बोलू देणार नाही असे विरोधक म्हणत होते. मात्र त्यांनी लक्षात ठेवावे, मोदी-अमित शहाला घाबरलो नाही, तुम्ही तर बच्चे आहात. गुजरातमध्ये ५६ इंच छाती फाडून आलोय हेही त्यांनी लक्षात ठेवावे अशा शब्दांत मेवाणी यांनी विरोधकांची समाचार घेतला.