मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा होणार


सामना प्रतिनिधी, सिंदखेडराजा

राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव १२ जानेवारीला साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जिजाऊ मांसाहेबांचा 421व्या जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टीवर मोठ्या थाटामाटात हा उत्सव पार पडणार आहे. या उत्सवाला ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील प्रमुख भूमिका बजावणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मराठा सेवा संघ व विविध कक्षाच्या माध्यमातून जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे. जिजाऊसृष्टीवर 450 पुस्तकांचे स्टॉल 150 खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. वाहनतळ व इतर व्यवस्थेचे नियोजन पूर्ण झाले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून 3 जानेवारी ते 12 जानेवारी सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सुरुवात झाली आहे. दररोज सिंदखेडराजा नगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडत आहे. 11 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने 421 मशाली पेटवून जिजाऊ जन्मस्थान राजवाडा ते जिजाऊ सृष्टी अशी मशाल यात्रा काढण्यात येणार आहे.

साडेसहा वाजता ज्ञानेश महाराज मुंबई यांनी निर्मित केलेले संत तुकाराम हे संगीत नाट्य पार पडणार आहे. रात्री नऊ वाजता महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 12 जानेवारीला सकाळी पहाटे जिजाऊ पूजन करण्यात येणार आहे आणि सकाळी सात वाजता वारकरी व टाळकरी दिंडी काढली जाणार आहे. नऊ वाजेला मराठा सेवा संघाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होईल. त्यानंतर त्यांचे भाषण सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना पुरस्कार वितरण व सामूहिक विवाह सोहळा आणि दुपारी दोन वाजेनंतर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ सृष्टीवर शिवधर्मपीठावर मुख्य सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.

या कार्यक्रमामध्ये ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील निर्माते व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व सर्जिकल स्ट्राइकचे मुख्य सेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर त्यांना मराठा सेवा संघाच्या सर्वोच्च मानला जाणारा मराठा विश्वभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे यांचे वारसदार एकत्र येणार आहेत. गेल्या वर्षी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज एकत्र आले होते. यावर्षी जन्मोत्सवाला प्रमुख सोहळ्याला उदयनराजे भोसले, संभाजी राजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जन्मेजय राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जिजाऊ जन्मोत्सव पार पडणार आहे.