‘जीना हाऊस’चा ताबा आम्हाला द्या!, पाकिस्तानची मागणी

4

सामना ऑनलाईन । कराची

मुंबईतील ‘जीना हाऊस’ हा बंगला पाकिस्तानच्या मालकीचा आहे. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने हा बंगला आपल्या ताब्यात द्यावा अशी मागणी पाकिस्तानने केली. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान मोहम्मद अली जीना यांचे निवासस्थान असलेल्या ‘जीना हाऊस’ची फाळणीचे प्रतीक अशी ओळख आहे. त्यामुळे हा बंगला पाडून त्या जागी सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच केली होती, परंतु पाकिस्तानने त्याला जोरदार विरोध केला आहे.

‘जीना हाऊस’ या बंगल्यासंदर्भातील मालकी हक्क हे पाकिस्तान सरकारकडे आहेत. त्याची बूज राखून हिंदुस्थानने या बंगल्याचे संरक्षण करायला हवे, तसेच हा बंगला पाकिस्तान सरकारकडे सुपूर्द करायला हवा अशी मागणी पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी केली आहे. ‘एक्प्रेस ट्रिब्युन’ने यासंदर्भातले वृत्त प्रसिद्ध केले आहे. मलबार हिल येथील ‘जीना हाऊस’ हा बंगला सुमारे अडीच एकर जागेवर वसलेला आहे. या ठिकाणी पाकिस्तानचे महावाणिज्य दूतावास उभारले जावे अशी पाकिस्तानची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

जीना हाऊसच्या जागी स्वातंत्र्ययुद्धाचे स्मारक उभारा! शिवसेनेची मागणी
जीना हाऊस ही इमारत हिंदुस्थानच्या फुटीचे जणू प्रतीकच आहे. शत्रू संपत्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर या इमारतीसंदर्भातील निर्णय आता हिंदुस्थान सरकार घेऊ शकते. त्यामुळे जरासाही विलंब न लावता सरकारने जीना हाऊसच्या जागेत हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ाचे भव्यदिव्य स्मारक उभारावे अशी मागणी शिवसेनेने आज केली. लोकसभेत शून्य प्रहरात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी जीना हाऊसच्या जागेत स्मारक उभारण्याची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या