विषाणुरहित पेशंट ट्रान्सपोर्ट सिस्टिमला पेटंट, जे. जे. रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

कोरोना काळात रुग्णांना एका विभागातून दुस-या विभागात डॉक्टर, रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाईकाला  कोणत्याही विषाणूची लागण होऊ न देता सुरक्षितपणे ने-आण करण्यासाठी जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी बनवलेल्या पेशंट ट्रान्सपोर्ट सिस्टिमला हिंदुस्थान सरकारच्या पेटंट विभागाने आज अखेर दोन वर्षांनी पेटंट प्रमाणपत्र बहाल केले. हे प्रमाणपत्र आज ई मेलच्या साहाय्याने डॉक्टरांना प्राप्त झाले आहे. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी बनवलेल्या नाविन्यपूर्ण उपकरणासाठी डॉक्टरांना मिळालेली ही पोचपावतीच म्हणावी लागेल..

अॅल्युमिनिअम आणि अॅक्रेलिकपासून बनवण्यात ट्रॉलीवर काचेच्या चेंबर बसवण्यात आले आहे. या चेंबरला ने-आण करण्यासाठी चाके जोडलेली आहेत. या चेंबरमधील रुग्णावर उपचार करण्यासाठी, त्याला योग्य तो ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सुविधा आहेत. त्याचबरोबर 360 डिग्रीमध्ये फिरणारा क@मेरा यात बसवण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजार अशा एका वैद्यकीय उपकरणाची किंमत ही सुमारे 25 लाख आहे. मात्र, आम्ही त्याच तोडीचे उपकरण अवघ्या 50 हजारांत बनवले आहे. मात्र, दोन वर्षांनंतर या उपकरणाला सरकारने पेटंट बहाल केल्यामुळे अशा प्रकारची उपकरणाचे एकाच वेळी उत्पादन करणे शक्य होणार आहे. या फायदा मुंबईतील सरकारी आणि पालिका रुग्णलयांसह दूरवरच्या शहरात, खेडय़ातही करणे शक्य आहे. या चेंबरचा उपयोग सर्वाधिक संसर्ग असलेल्या टीबी, ईबोला रुग्णांची ने-आण करतानाही करणे शक्य होणार आहे.

डॉ. अजय भंडारवार, प्रमुख, जनरल सर्जरी विभाग, जे. जे. रुग्णालय.