कश्मीरात पोलीस वसाहतीवर आत्मघाती हल्ला; आठ जवान शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर

पुलवामा येथील पोलीस वसाहतीवर आज पहाटे जैश ए मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांनी भयंकर आत्मघाती हल्ला चढवला. पोलिसांच्या कुटुंबांना ओलीस ठेवण्याच्या इराद्यानेच अतिरेकी वसाहतीत घुसले. पण पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी अत्यंत चतुराईने 36 कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र ही कामगिरी फत्ते करत असताना आठ जवान शहीद झाले. यापैकी एक महाराष्ट्रातील आहे. दरम्यान, दिवसभर चाललेल्या या धुमश्चक्रीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला.

पुलवामा येथे शनिवारी पहाटे चार वाजता पोलीस वसाहतीत तीन अतिरेकी घुसले. येथे असलेल्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स सेंटरला अतिरेक्यांनी निशाणा बनवले. अतिरेक्यांच्या अंदाधुंद गोळीबारात चार जवान गंभीर जखमी झाले. पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देताच अतिरेकी एका इमारतीमध्ये घुसले. तेथूनच त्यांनी तुफान गोळीबार केला. काही हातबॉम्बही फेकले. यावेळी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात आठ जवान शहीद झाले असून त्यात सीआरपीएफचे जवान रवींद्र धनवडे आणि जसवंतसिंग तसेच पोलीस कॉन्स्टेबल इम्तियाज अहमद शेख यांचा समावेश आहे. रवींद्र धनवडे हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्हय़ातील मोहोट येथील रहिवासी आहेत. शहीद जवानांत चार सीआरपीएफचे असून एक स्थानिक पोलीस तर तीन जवान स्पेशल पोलीस फोर्सचे असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात मोहंमद याकूब जोरा, पम्मीकुमार, कर्मी प्रभू नारायण, एस.बी. सुधाकर हे जखमी झाले.

पोलीस वसाहतीमध्ये एन्काऊंटर सुरू असल्याचे कळताच फुटीरवादी मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर उतरले. अतिरेक्यांना संरक्षण देण्यासाठी या फुटीरवाद्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. या जमावाला हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

जवानांनी वसाहतच रिकामी केली

अतिरेकी हल्ला होताच पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी एकीकडे अतिरेक्यांना थोपवून धरत दुसरीकडे वसाहतीमधील 36 कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. या वसाहतीत काही अधिकाऱयांसह पोलीस कर्मचाऱयांची कुटुंबे राहतात. या कुटुंबांना ओलीस ठेवण्याचे अतिरेक्यांचे षड्यंत्र पोलिसांनी उधळून लावले. सर्व कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी अतिरेकी लपलेल्या इमारतीला घेराव घालून दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. तिसऱया अतिरेक्याचाही शोध घेण्यात येत आहे.

अतिरेकी शोधण्यासाठी ड्रोनचा वापर

वसाहतीत घुसून निष्पापांना ओलीस ठेवण्याच्या इराद्याने अतिरेकी घुसले होते. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्यास आम्ही अगोदर प्राधान्य दिले असे लष्कराच्या 15 व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल जे. एस. संधू यांनी सांगितले. अतिरेक्यांचा मुकाबला करण्यासाठी पॅरा कमांडोंनाही पाचारण करण्यात आले होते. त्याचबरोबर अतिरेक्यांची लपण्याची नेमकी जागा तसेच आतमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात आल्याचेही संधू यांनी सांगितले. तर कश्मीर खोऱयाचे पोलीस महानिरीक्षक एस. पी. वैद्य यांनी आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय वाईट होता,
आमचे आठ जवान शहीद झाले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

तीन पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान

भेकड पाकडय़ांचा पाणी पिणाऱया जवानावर गोळीबार

जम्मूच्या आरएसपुरा सीमेवर पाकिस्तानी लष्कराने शस्त्र्ासंधीचे उल्लंघन करून हिंदुस्थानी चौक्यांवर तुफान गोळीबार केला. ही धुमश्चक्री सुरू असतानाच एका पाकी रेंजर्सने पाणी पिणाऱया हिंदुस्थानी जवानावर गोळी झाडली. गोळी कानाला चाटून गेल्याने हा जवान जखमी झाला. त्यानंतर सुंदरबनी परिसरातील देवरा गावावर पाक लष्कराने उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्तानी लष्कराला सीमा सुरक्षा दलाने मुंहतोड जबाब दिला. यात तीन पाकी रेंजर्स ठार झाले.