कठुआमध्ये शाळेत पोहचताच मुलं पडताहेत बेशुद्ध, संशयाच्या भूताने पछाडले

63
black-magic

सामना ऑनलाईन। कठुआ

जम्मू कश्मीरमधील कठुआ येथील सित्ती गावातील एका शाळेत सध्या अजब घटना घडत असल्याचे समोर आले आहे. शाळेत येताच विद्यार्थी विचित्र वागत असून जोरजोरात किंचाळत बेशुद्ध पडत आहेत. हा भूतबाधेचा प्रकार असावा असा गैरसमज झाल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणेच बंद केले आहे. हा नक्की काय प्रकार आहे हे समजत नसल्याने शिक्षकांबरोबरच तज्ज्ञ मंडळीही चक्रावले आहेत.

कश्मीरमध्ये गेल्या आठवड्यापासून शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी खूप उत्साहात होते. मात्र, शाळेत पाऊल टाकताच अचानक काही विद्यार्थी जोरजोरात किंचाळू लागले. तर काहीजण जोरजोरात ओरडत बेशुद्ध पडले. यामुळे हा भूतबाधेचा प्रकार असावा असे पालकांना वाटले. शाळेत भूत असल्याचा समज झाल्याने घाबरून पालकांनी मुलांना शाळेत पाठवणेच बंद केले आहे. यादरम्यान शिक्षण विभागानेही या घटनेची दखल घेत काही वैद्यकीय तज्ज्ञांना शाळेत पाठवले. पण विद्यार्थ्यांची तपासणी केल्यावर त्यांना कोणताही आजार झाला नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे मुलांना नक्की काय झाले आहे, असा प्रश्न पालकांबरोबरच शिक्षकांनाही पडला आहे.

2006 सालीदेखील अशीच घटना येथील मशेडी शाळेत घडली होती. त्यावेळीही डॉक्टरांचे एक पथक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. पण विद्यार्थ्यांमद्ये कुठल्याही आजाराची लक्षणे आढळली नव्हती. मात्र महिन्याभरानंतर सर्व सुरळीत झाले असे येथील शिक्षकांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या