कंटेनरमध्ये सापडले कोट्यावधीचे सोने

सामना प्रतिनिधी । उरण

न्हावा शेवा बंदर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत एसी घेऊन आलेल्या कंटेनरमधून कोट्यावधी रूपये किमतीचे सोने पकडण्यात आल्याची सनसनाटी घटना घडली आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा उरणचे जेएनपीटी बंदर तस्करासाठीचा अड्डा ठरत असल्याची बाब अधोरेखीत झाली आहे.

हा कंटेनर नवघर गावाजवळील जीडीएल नावाच्या गोदामात तपासाला असता त्यात जनरल कंपनीच्या नावाने एसी घेऊन आलेल्या बॉक्समधून लपवून हे सोने आणण्यात आले असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई करीत असताना गोदामातील सर्व कामगारांना बाजूला काढण्यात आले होते.

उरणचे जेएनपीटी बंदर हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या तस्करीने गाजत आले आहे. यापूर्वी या बंदरातून दुबईला जाणाऱ्या कंटेनरमध्ये अनेकदा रक्तचंदन असल्याचे या पूर्वीच्या कारवायांतून समोर आले आहे. मध्यंतरी कोप्रोलीच्या एका गोदामात ग्रीसमधून रिव्हॉव्हर आणण्यात आल्याचे उघड झाले होते. तर एका गोदामात लाकडी फर्निचरमधून नशेची पावडर पकडण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर बंदरातील स्कॅनिंग मशीनची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र या तस्करीशी वरिष्ठ अधिकारीच सामील आहेत की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.