जेएनपीटीच्या कंत्राटी कामगारांचा ३ जानेवारीपासून बेमुदत संप

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

जेएनपीटीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसाठी बुधवार ३ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. न्हावा शेवा बंदर कामगार संघटना(अंतर्गत) आणि जेएनपीटी जनरल कामगार संघटना या संपात सामिल होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे समान कामांना समान वेतन मिळाले पाहिजे, सरकारी गॅझेटप्रमाणे सर्व कामगारांना किमान २४ हजार रूपये प्रतिमहिना पगार मिळाला पाहिजे, सर्व निवृत्त कंत्राटी कामगारांच्या कुटूंबातील बदली वारसांना नोकरी मिळाली पाहिजे, सर्व निवृत्त कामगारांना ग्रच्यूईटी मिळाली पाहीजे, सर्व कामगारांना बोनस मिळाला पाहिजे, सर्व कामगारांना भरपगारी साप्ताहीक सुट्टी मिळाली पाहिजे, इलेक्ट्रीक व सिव्हील विभागातील सुपरवायझर कामगारांचा वेतन करार लवकरात लवकर केला पाहिजे, ऑफिसर्स व कामगारांच्या बसेसवर काम करणाऱ्या ड्रायव्हर व क्लिनरना पगारवाढ मिळाली पाहिजे, जेएनपीटी मधिल भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आदी मागण्यांसाठी बुधवार ३ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते भूषण पाटील यांनी दिली. या संपात जेएनपीटीत काम करणारे सफाई कामगार, बाग कर्मचारी, विद्युत विभाग, पाणी पुरवठा विभागात काम करणाऱ्या जास्तीत जास्त कामगारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भूषण पाटील यांनी केले आहे.