एका वर्षात नोकऱ्यांची संख्या तिपटीने वाढली; फेब्रुवारीमध्ये साडेआठ लाख नवे रोजगार

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडण्ट फंड ऑर्गनायझेशन’च्या (ईपीएफओ) दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये देशातील संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. नोकऱ्यांची आकडेवारी 8 लाख 61 हजारांवर पोहचली आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये 2 लाख 87 हजार नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या ईपीएफओने नुकत्याच जाहीर करण्यात आकडेवारीनुसार जानेवारी 2019 मध्ये नव्या नोकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 8 लाख 94 हजारांवर पोहोचले आहे.

‘ईपीएफओ’ने सप्टेंबर 2017 पासून रोजगाराचे आकडे जमवण्यास सुरुवात केली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये 22 ते 25 या वयोगटातील 2 लाख 36 हजार तरुणांना आणि 18 ते 21 वयोगटातील 2 लाख 9 हजार तरुणांना रोजगार मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2019 या 18 महिन्यांमध्ये 80 लाख 86 हजार नव्या रोजगारांची निर्मिती झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ‘ईपीएफओ’तर्फे विविध कंपन्या, संस्था आणि फर्ममध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम वजा केली जाते. त्यामुळे नव्याने रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे तपशील ‘ईपीएफओ’ला मिळतात. त्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे.