छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना मनपामध्ये थेट नोकरी

1

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शहरातील छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना मनपामध्ये थेट नोकरी देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. तसेच आकृतीबंधामध्येही खेळाडूंना नोकरी देण्यासाठी जागा राखीव ठेवण्याची शिफारस करण्यात आली असून, हा आकृतीबंध मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला जाणार आहे. आकृतीबंधास मंजुरी मिळताच खेळाडूंना मनपामध्ये थेट नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाते. यावर्षी पहिल्यांदाच मनपाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून शहरातील छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, एशियन, वल्र्ड, कॉमनवेल्थ गेममध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आणि मनपा शाळांतील राज्यस्तरीय खेळाडू, गुणवंत विद्याथ्र्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. मनपाच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदकुमार घोडेले हे होते तर व्यासपीठावर उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, विरोधी पक्षनेते जमीर कादरी, शिक्षण सभापती मनोज बल्लाळ, आरोग्य सभापती मीना गायके, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, स्वाती नागरे, नगरसेवक ऋषिकेश खैरे, कर निर्धारक व मूल्यांकन अधिकारी तथा क्रीडा विभाग प्रमुख वसंत निकम, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, गोविंद तांदळे, प्रा. शरद कचरे आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, महानगरपालिकेकडून पहिल्यांदा क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले आहे. शहराला ऐतिहासिक वारसा लाभल्याचे वैभव आहे. त्या प्रमाणे क्रीडा नगरीचे वैभव लाभले आहे. क्रीडापटूंचे हे शहर अशी ओळख निर्माण झाली पाहिजे. शहराच्या खाणीतून हिरे शोधून काढले असून ही आपली संपत्ती आहे. शहरातील छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना मनपामध्ये थेट नोकरी देण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच मनपाचा आकृतीबंध तयार करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असून, त्यामध्ये खेळाडूंना थेट नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी जागा राखीव ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. या आकृतीबंधास मंजुरी मिळाल्यानंतर मनपामध्ये खेळाडूंना नोकरी देण्यात येईल. शहरातील खेळाडूंना बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच खेळाडूंना आर्थिक मदत देण्यास सकारात्मक कार्यवाही केली जात असून, लवकरच मदतीचे वाटप केले जाईल. त्यासोबतच शहरात ७० ठिकाणी ओपन जिम सुरू केले जात आहे.

खेलो इंडियाच्या माध्यमातून तीन स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारणार
केंद्र सरकारने खेलो इंडियाच्या माध्यमातून स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी मनपाला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात तीन ठिकाणी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी १७ कोटी ५० लाखांचा निधी मिळणार आहे. खेळाडूंसाठी हे स्पोर्टस कॉम्प्लेक्स अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, विरोधी पक्षनेते जमीर कादरी यांनी मनोगत व्यक्त केले.

५० खेळाडूंचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान
शहरातील छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंसह विविध क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ५० खेळाडू, गुणवंत विद्यार्थी व प्रशिक्षकांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन महापौर घोडेले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी खेळाडूंच्या कार्याचा यथोचित गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी एव्हरेस्टवीर प्रा. मनीषा वाघमारे, क्रीडा संघटक डॉ. संजय मोरे, सिध्दी हत्तेकर यांचे वडील प्रवीण हत्तेकर, गोविंद शर्मा, प्रवीण क्षीरसागर, साक्षी चितलांगे, सागर मगरे, अंकित बावणे, प्रा. एकनाथ साळुंके, आदित्य तळेगावकर, दिनेश चितलांगे, इशा महाजन, मृगल पेरे, दीपक जावळे, विजय काकडे, प्रा. शरद कचरे, गोविंद तांदळे आदींचा सत्कार करण्यात आला.