तरुणपणातील सांधेदुखी

>>डॉ. पुष्कर शिकारखाने

सांधेदुखी… आता तरुणांमध्येही आढळते. अतिरिक्त व्यायाम… ताणतणाव… चुकीची जीवनपद्धती कसे लांब राहता येईल या दुखण्यापासून…?

तरुणांमध्ये होणारा संधीवात हा ‘ह्युमटॉईड आर्थायटीस’ या गटामध्ये मोडतो. त्यात आपल्याच शरीरात आपल्याच पेशींविरोधात प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडीज) निर्माण होतात. हे द्रव्य शरीरातील वेगवेगळ्या पेशींचे नुकसान करतात. हा आजार नेमका का होतो, कसा होतो याबाबत वैद्यकीय क्षेत्राला पुरेशी माहिती मिळालेली नाही. पण त्यामागील कारणांचा अभ्यास मात्र झालेला आहे. यात अनुवंशिकता, वातावरणातील घटक आणि ताणतणाव यांचा महत्त्वाचा भाग असावा.

या विकारात तरुणांच्या हाताच्या बोटांचे सांधे, मनगटे, कोपर आणि पायांचे सांधे, गुडघे दुखतात. सकाळी उठल्यावर हे दुखणं जास्त असल्याचं जाणवतं. त्याला मॉर्निंग स्टीफनेस म्हणतात. सकाळी हालचाल करणंही कठीण होऊन बसतं. कोमट पाण्यात थोडा वेळ हात बुडवून ठेवल्याने हे सांधे बरे होतात. थंडीच्या प्रभावामुळे किंवा पावसाळ्यातही अंग गारठले तर अशा प्रकारच्या संधीवाताचे प्रमाण तरुणांमध्येही वाढलेले दिसते.

तरुणांमध्ये सांधेदुखीची आणखीही कारणे सांगता येतील. यात अती व्यायामामुळेही सांध्यांवर ताण पडून गुडघे दुखणं किंवा एखादा सांधा दुखणं सुरू होतं. योग्य प्रकारे आणि ठरावीक व्यायाम करून आपले स्नायू बळकट करायला हवेत. शरीरात पुरेसे लोह जाईल असे पदार्थ खावेत.

उपाय काय…?

यावर वेदना कमी करणारी आणि सूज कमी करणारी औषधे द्यावी लागतात. पण स्टेरॉईडचा वापर कमी करण्यासाठी ‘मिथोट्रिक्सेट’ आणि ‘सल्फासॅलाजीन’ ही महत्त्वाची औषधे आहेत. आजच्या काळात काही मोनोक्लोनल ऍण्टीबॉडीज ही नवीन औषधेही वापरली जातात. पण फिजिओथेरेपी आणि व्यायाम खूप महत्त्वाचा असतो.

जीवनशैली सुधारा!

‘ओस्टिओ आर्थरायटीस’ या सांधेदुखीच्या प्रकारात एक किंवा अधिक सांधे दुखतात किंवा तुटतात. थोडक्यात सांगायचे तर त्याला ‘झीज होणे’ असेही म्हणतात. कार्टिलेज म्हणजे एक चिकट ऊतक आहे जो हाडांच्या सांध्यावर असतो. काहीवेळा शारीरिक क्रियांमुळे हाडे एकमेकांवर घासली जातात आणि त्यामुळे सांध्यांना सूज येते. हा प्रकार बहुतांश गुडघे, कंबर, हात आणि पाय यामध्ये दिसतो. मात्र आजच्या चुकीच्या जीवनशैलीत योग्य तो बदल केला, ताणतणाव आणि निराशा टाळली तर हा आजार बरा होतो. वजन कमी केल्यामुळे आणि योग्य पद्धतीने व्यायाम केल्यामुळे ‘ओस्टिओ आर्थरायटीस’ बरा होऊ शकतो. सकाळी उठल्यावर किंवा बराच वेळ बसून राहिल्यामुळे गुडघे दुखू शकतात.

एकूणच अंग का दुखते

  • उगीचच अंग दुखते त्याला ‘फॅब्रोमायजिया’ म्हटलं जातं, त्यामागे बरीच इतर कारणं असू शकतात.
  • लोह, व्हिटॅमीन-डी यांची कमतरता हे महत्त्वाचे घटक असतात.
  • मानसिक अस्वास्थ्यही अंग दुखण्याला एक कारण होऊ शकते.
  • झोप नीट न झाल्यामुळेही अंग दुखू शकते.
  • सोरायसिस नावाच्या त्वचेच्या विकारातही संधीवाताचे रुग्ण दिसू शकतात.
  • युरीक ऍसिड वाढल्यामुळेही साधे दुखू लागतात. यात एखाद्या सांध्याला सूज येते.
  • काहीवेळा सांध्यांमध्ये इन्फेक्शन झाले असेल तर, टीबीमध्येही एखादा सांधा दुखू शकतो.
  • रिऍक्टिव्ह आर्थायटीस नावाच्या आजारात पोटामध्ये इन्फेक्शन होते. त्यानंतर किंवा युरीन इन्फेक्शननंतरही सांधे दुखू शकतात.

लेखक जनरल फिजिशियन आहेत.