पत्रकार राजेश शंकरराव गंगमवार यांचे निधन

सामना प्रतिनिधी । बिलोली

बिलोली येथील पत्रकार राजेश शंकरराव गंगमवार (४९) यांचे आज दुपारी चार वाजता हैद्राबाद येथे अपोलो रुग्णालयात दुःखद निधन झाले. गेल्या दीड महिन्यापासून ते मृत्यूशी झुंज देत होते. आज दुपारी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

मुळचे धर्माबाद येथील असलेल्या राजेश्वर गंगमवार यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दै.’सामना’पासून सुरु केली होती. त्यानंतर ते ‘लोकमत’मध्ये काम करत होते. विविध सामाजिक विषय तसेच नागरी समस्या तसेच राज्यपातळीवरील बातम्या देण्यास त्यांचा हातखंडा होता. परिसरातील समस्या, सामाजिक न्याय देण्याची भूमिका तसेच गुन्हेगारीवरील आळा घालण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रात सडेतोड लिखाण केले. त्यांना याबाबत पुरस्कारही मिळाले होते. बिलोली शहरातील वेगवेगळ्या चळवळीत देखील त्यांनी सहभाग नोंदविला होता.

गेल्या दीड महिन्यापासून ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर अपोलो रुग्णालयात आज दुपारी चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सबंध जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता बिलोली येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.