धर्माच्या शिकवणीचं अध्ययन करा, न्यायालयाचे आरोपीला आदेश

5

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

एका व्यक्तिला शिक्षा म्हणून धर्माची शिकवण घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अमेरिकेत घडलेल्या या घटनेमधील गुन्हेगाराने एका शीख व्यक्तिवर हल्ला केला होता.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अँड्र्यु रामसे नावाच्या एका अमेरिकन नागरिकाने हरविंदर सिंह डोड यांच्यावर हल्ला केला होता. डोड यांचं अमेरिकेत दुकान आहे. रामसे याने डोड यांच्याकडे सिगारेटची मागणी केली होती. त्यावर डोड यांनी त्याला ओळखपत्र दाखवण्याबद्दल सांगितलं होतं. मात्र, त्याने ओळखपत्र दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे डोड यांनीही सिगारेट देणार नाही, असं सांगितलं. त्यावर चिडलेल्या रामसे याने डोड यांची दाढी खेचली आणि त्यांना मारत जमिनीवर पाडलं. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या उर्वरित ग्राहकांनी त्याला अडवलं आणि पोलीस येईपर्यंत पकडून धरलं.

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर रामसे याने डोड यांच्यावर हल्ला केल्याचं कबूल केलं. इतर धर्मीय आणि वंशीय लोकांप्रतिची द्वेषाची भावना कमी करण्यासाठी न्यायालयाने रामसे याला शीख धर्माच्या शिकवणीचं अध्ययन करण्याचे आदेश दिले. रामसे याने शीख धर्माबाबत जाणून घ्यावं आणि न्यायालयाला त्याने मिळवलेल्या माहितीविषयी सांगावं असंही न्यायालयाने शिक्षेत नमूद केलं. इतर धर्मांच्या बाबतीत असलेलं अज्ञान हे अशा द्वेषाला जन्म देतं. त्यासाठी अन्य धर्मांची शिकवण जाणून घेणं हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं निरीक्षणही न्यायाधीशांनी नोंदवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या