Plea Barganing कैद्यांना शिक्षेबद्दल सौदेबाजी करण्याचा अधिकार आहे – न्यायाधीश

3

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

कैद्यांना आपल्या प्रकरणात शिक्षेबद्दल सौदेबाजी (Plea Barganing) करण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन न्यायाधीश साजिद आरिफ सैय्यद बुलढाणा कारागृहात कायदेविषयक माहिती शिबीरात केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा आणि जिल्हा वकील संघ बुलढाणाचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहात मंगळवारी सौदबाजीची विनंती, कैद्यांचे अधिकार आणि ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर आयोजित कायदेविषयक माहिती शिबीरात ते बोलत होते.

न्यायाधीश साजिद आरिफ सैय्यद पुढे म्हणाले की, कैद्यांना आपल्या अधिकाराची जाणीव असणे आजकालच्या युगात अत्यावश्यक आहे. एखाद्या प्रकरणात आरोपी म्हणून अटक झाल्यास 24 तासाच्या आत न्यायदंडाधिकारी यांचेकडे पोलिसांनी हजर करणे आवश्यक आहे व त्याचप्रमाणे अटक का केली याबाबतची माहिती देणे बंधनकारक आहे. कारागृहात असलेल्या कैद्यांना पौष्टीक जेवण मिळण्याचा अधिकार आहे. त्यांना न्यायालयातील प्रकरणात हजेरी मागण्याचा अधिकार आहे तसेच आजारी असल्यास उपचार मिळविण्याचा सुध्दा अधिकार आहे. तरी कारागृहात असलेल्या कैद्यांनी मानव अधिकाराचा सदुपयोग करावा तसेच दुरुपयोगापासून दूर रहावे. ज्या प्रकरणात गुन्हा गंभीर स्वरुपाचा नसल्यास आरोपीला फिर्यादीसोबत शिक्षेबद्दल सौदेबाजी करण्याची विनंती करता येते. बरेच आरोपी हे किरकोळ गुन्ह्यात 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगात असतात. त्यांना शिक्षकेबद्दल सौदेबाजीची विनंती फिर्यादी आणि न्यायालयाकडे करता येते याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे. भोगलेल्या शिक्षेतून तशा आरोपीस सुट मिळते आणि तुरुंगात असलेला कालावधी त्यातून वजा करण्यात येतो म्हणून गंभीर स्वरुपाचा गुन्हा नसलेल्या कैद्यांनी सौदेबाजीची विनंती न्यायालयाकडे करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कैद्यातील जेष्ठांना कोणकोणते अधिकार आहेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात अ‍ॅड. राहुल दाभाडे यांनी कैद्यांचे अधिकार व अंतर्गत चाचणी या विषयावर मार्गदर्शन सूचविले की, त्याअधिकाराचा दुरुपयोग कैद्यांनी करु नये. अ‍ॅड. विक्रांत मारोडकर यांनी सौदेबाजी या विषयी मार्गदर्शन करतांना कैद्यांनी किरकोळ गुन्ह्यात या कायद्याचा फायदा घ्यावा अशी विनंती केली. सदर शिबीराचे सुत्रसंचालन आणि आभार अ‍ॅड. राज शेख वकील संघ बुलढाणा यांनी मानले.