जुहीची तीन वर्षांची डोकेदुखी थांबली, फोर्टीस रुग्णालयात यशस्वी उपचार

सामना प्रतिनिधी । ठाणे

मेनिन्गिटीस या विकाराने त्रस्त असलेल्या जुही गायकवाड या नववीतील विद्यार्थिनीवर नवी मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आल्याने तिला डोकेदुखीपासून आराम मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या असहाय्य डोकेदुखीमुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नसल्याने जुहीवर शाळा सोडण्याची वेळ आली होती. मात्र आता तिचा अभ्यास पूर्वीप्रमाणे सुरू झाला आहे.

जुहीच्या डोकेदुखीवर कुठेच उपचार न झाल्याने तिच्या पालकांनी तिला वाशी येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल केले. तिथे न्युरोलॉजिस्ट डॉ. पवन ओझा यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. सुरुवातीच्या तपासणीमध्ये तिच्या डोळ्यांमधील ग्रंथीचा भाग कोरडा झाल्याचे आढळून आले. ज्यामधून त्यांनी अंदाज काढला की रुग्ण सजोग्रेन सिंड्रोमपासून पीडित आहे. हा रोगप्रतिकार प्रणालीचा रुमेटोलॉजिकल आजार आहे. हा आजार डोळे व तोंडाच्या कोरडेपणामधून आढळून येतो.

रोगनिदान करण्यासाठी एकाच वेळी लम्बर पंक्चर टेस्ट करण्यात आली. या चाचणीमधून निदर्शनास आले की सेरेब्रोस्पायनल फ्ल्युड पेशी जास्त प्रमाणात होत्या, ज्यामधून मेनिन्गिटीस (मेंदू व पाठीच्या कण्याभोवती असलेल्या मेम्ब्रेन्सना येणारी सूज) आजार असल्याचे निदान झाले. सजोग्रेन सिंड्रोममुळे तिला मेनिन्गिटीस आजार झाल्याचे उघड झाल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले आणि ती या जीवघेण्या विकारातून पूर्णपणे बरी झाली.