छटपूजेसाठी जुहू चौपाटीवर तगडा बंदोबस्त

प्रातिनिधीक फोटो

छटपूजेसाठी जुहू चौपाटीवर तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 500 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवणार आहेत.

रविवारी होणाऱया छटपूजेसाठी मोठय़ा संख्येने महिला येणार आहेत. तेव्हा कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. खासकरून पश्चिम उपनगरातील जुहू चौपाटीवर मोठय़ा संख्येने महिला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. त्या उपाययोजनांचा आढावा मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतला.

जुहू चौपाटीवर रविवारी पर्यटकांची गर्दी असते. त्यातच रविवारी छटपूजा असल्याने तेथे सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. साध्या वेशातील पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस तैनात ठेवले जाणार असल्याचे परिमंडळ-9चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले. तसेच जीवरक्षकांना चौपाटीवर तैनात केले जाणार आहे.