भंगार वेचण्याच्या नावाखाली करतात हाथ की सफाई

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्यरात्री भंगार वेचण्याचा नावाखाली हाथ की सफाई करणाऱ्या टोळीचा जुहू पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पारू देवेंद्र, कस्तुरी देवेंद्र, शांती देवेंद्र आणि जावेद ऊर्फ मजीद सलीम शेख अशी त्या चौघांची नावे आहेत. या टोळीकडून चोरीचे पाइप पोलिसांनी जप्त केले आहेत. त्या चौघांनाही न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जुहू परिसरात सध्या महानगरपालिकेच्या वतीने विकासकामे सुरू आहेत. कामे सुरू असताना 28 लोखंडी पाइप चोरीस गेल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहाय्यक आयुक्त दत्तात्रय भरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांच्या पथकातील उपनिरीक्षक धनराज डोंगरे, पोलीस हवालदार प्रमोद तानवडे, महादेव नलावडे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास एक रिक्षा जात असल्याची माहिती मिळाली. अंधारामुळे रिक्षाचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता. तेव्हा एका कॅमेरामध्ये त्या रिक्षाचा पुढील काचेचा भाग दिसून आला. त्या काचेवर साईबाबाचा स्टिकर होता. त्या स्टिकरचा आधार घेत पोलिसांनी तपास पुढे नेला.

तपासादरम्यान पोलिसांनी 50 रिक्षा शोधून काढल्या. त्यानंतर पोलिसांनी जावेदला चौकशीकरता ताब्यात घेतले. जावेद हा नालासोपारा येथे राहतो. तो रात्रीच्या वेळेस रिक्षा चालवण्याकरता अंधेरी परिसरात येतो. चोरीचे लोखंडी पाइप आणि अन्य वस्तू नेण्याच्या मोबदल्यात त्याला 300 रुपये मिळतात. जावेदच्या चौकशीमध्ये पारू, शांती, कस्तुरी यांची नावे समोर आली. आज पहाटे पोलिसांनी सापळा रचून त्या तिघींना अटक केली. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांनी 20 लोखंडी पाइप जप्त केले आहेत. अटक केलेल्या त्या तिघी नेहरू नगर परिसरात राहतात. मध्यरात्री 2-3 वाजता भंगार वेचण्याचा नावाखाली त्या घराबाहेर पडतात. भंगार वेचण्याचा नावाखाली त्या हाथ की सफाई करतात. चोरलेल्या वस्तू या जावेदच्या रिक्षातून त्या नेत होत्या, अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत होती.