‘रिबेरों’नी पोलीस अधिकाऱ्यांचे खच्चीकरण थांबवावे, निवृत्त महासंचालक कडाडले

सामना प्रतिनिधी, मुंबई

ज्युलियो रिबेरो हे रिटायर्ड होऊन दोन दशकांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. नव्वदी गाठलेल्या रिबेरो यांनी आता नवीन पिढीला, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नको तो सल्ला देण्याचे, त्यांच्यावर टीका करण्याचे बंद करावे, अलीकडे चांगल्या पोलिसांवर ते विनाकारण तोंडसुख घेत आहेत. हे अशोभनीय आणि लाजीरवाणे आहे. या वयात त्यांनी केवळ आराम करावा, असे निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरिचा व मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त आर. डी. त्यागी यांनी दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

ठाण्याचे सध्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे खात्यात येण्यापूर्वी रिबेरो महाराष्ट्र पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे परमबीर यांच्या कामाविषयी त्यांना काहीच माहिती नाही. अशा परिस्थितीत एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांवर टीका-टिप्पणी करण्याचा रिबेरोंना अधिकार पोचत नाही. परमबीर सिंग यांचे काम चांगले आहे. गेल्या साडेतीन वर्षापासून ते सर्वोत्तम कामगिरी करीत असल्यामुळे ते जनताभिमुख झाले आहेत. त्यामुळेच मुंबईच्या आयुक्तपदासाठी त्यांचे नाव घेतले जात होते. ते शर्यतीत होते. आम्ही परमबिर सिंगचे काम जवळून पाहिले आहे. ते सक्षम आणि चांगल्या दर्जाचे अधिकारी आहेत. परंतु तरीही त्यांना ‘बॅड कॉप’ म्हणून संबोधण्यात आले, अशा प्रकारची अनाठायी टीका, टिप्पणी करणे म्हणजे चांगल्या अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण करण्याचे व नागरिकांमध्ये अपप्रचार करण्याचे कृत्य आहे, असे निवृत्त पोलीस महासंचालक पसरिचा व आर.डी. त्यागी यांनी दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. रिबेरो यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रात परमबीर सिंग यांची ‘बॅड कॉप’ अशी अप्रत्यक्षपणे संभावना केली होती. त्यावर या दोन निवृत्त अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दै. ‘सामना’शी बोलताना व्यक्त केली.

पसरिचा पुढे म्हणतात, ‘रिबेरो हे काही कंपन्यांचे सल्लागार आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीची त्यांना गरज लागते. ते सतत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करीत असतात. आपल्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांची मोक्याच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून सरकार दरबारी प्रयत्न करीत असतात. अशा निवृत्त अधिकाऱ्याने कुणाही अधिकाऱ्यावर एकतर्फी टीका करणे, पक्षपाती लिखाण करणे योग्य नाही. जर चांगले बोलणे जमत नसेल तर शांतपणे आराम करावा, पण अशाप्रकारे टीका करून पोलिसांची प्रतिमा मलिन करू नये. ते स्वतःच पोलीस खात्यात असलेला त्यांचा आदर कमी करीत आहेत. त्यांनी असे बोलायचे थांबवावे, असेही पसरिचा व त्यागी यांनी शेवटी सांगितले.